गणेश खळदकर
पुणे : शिक्षकभरतीसाठी अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी ऑनलाइन घेण्यासाठी बाह्य यंत्रणा अर्थात एजन्सी नियुक्त करावी आणि अभियोग्यता-2022 चाचणी पार पाडावी. असे स्पष्ट निर्देश राज्याचे कक्षाधिकारी दत्तात्रय शिंदे यांनी शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांना दिले आहेत. शिक्षण आयुक्तांच्या नियंत्रणाखाली निविदा प्रक्रिया पार पाडण्यात यावी, असेही सांगण्यात आले आहे. अभियोग्यता चाचणी लवकरच ऑनलाइन होणार असून, शिक्षकभरतीसाठी नवीन उमेदवारांना संधी मिळणार असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे.
अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेण्यासंदर्भातील 7 फेब्रुवारी 2019 च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार फेब्रुवारी 2022 मध्ये संबंधित यंत्रणांचा समन्वय साधून सुयोग्य दिनांकास परीक्षेचे आयोजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु, पुढील काळात संबंधित परीक्षा बारगळल्याचे दिसून येत होते. त्यानंतर शिक्षकभरती एमपीएससीमार्फत होईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती.
मात्र, शासनाच्या संबंधित निर्देशामुळे सध्यातरी शिक्षकभरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्व शाळांतील शिक्षणसेवकांची भरती अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या गुणांच्या आधारे करण्याचा निर्णय 2017 साली घेण्यात आला आहे. त्यासाठी पवित्र पोर्टल तयार करण्यात आले. त्याचवेळी सहा महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेण्याचे स्पष्ट करण्यात आले होते. परंतु, डिसेंबर 2017 नंतर ही परीक्षा घेतलेली नाही.
शिक्षकभरती संदर्भातील सर्व कामकाज एमपीएससीकडे सुपूर्त करण्यासाठी तसेच तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी काही काळ लागणार आहे. तोपर्यंत भरती प्रक्रिया रोखून धरणे शक्य होणार नाही. त्यामुळे हा पर्यायदेखील शासनाने खुला ठेवला आहे. शासनाच्या पत्रात दिलेली कार्यवाही पूर्ण झाल्यावर अभियोग्यता चाचणी घेण्यात येणार आहे.
– सूरज मांढरे, शिक्षण आयुक्त