File Photo 
पुणे

पुणे : एकाच सोसायटीतील 11 सदनिका फोडल्या; पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: वानवडी परिसरातील सोसायटीमधील अकरा सदनिकांचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरफोडीचा प्रयत्न केला. औंध येथेही एका सदनिकेचे कुलूप तोडून व्हिडीओ कॅमेरा, महागडी घड्याळे, सोन्याचे कॉईन, विदेशी चलन असा पावणेदोन लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरी केला. सुखसागरनगर येथे मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औंध येथील गौरव साठे (वय 42) यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. साठे यांचे औंधमधील हर्ष विहार सोसायटीमध्ये घर आहे.

फिर्यादी हे बुधवारी (ता.6) बाहेर गेले होते. त्यावेळी मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास चार चोरट्यांनी फिर्यादीच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी घराच्या कपाटातील व्हिडीओ कॅमेरा, ब्रँडेड घड्याळ, सोन्याची नाणी, यूएई चलन असा पावणेदोन लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक बी. आर. झरेकर तपास करीत आहेत.
तर वानवडी येथील घरफोडीप्रकरणी शैलेश बाफना (वय 40, बी.टी.कवडे रस्ता, घोरपडी) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे वानवडीतील परमारनगर सोसायटीच्या फेज तीनमध्ये राहतात.

बुधवारी (ता. 14) रात्री मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी फिर्यादीच्या घराचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश करून चोरी केली. फिर्यादी यांच्यासह अनिल शाह, रिहान शेख, रवींद्र दळवी, गीता जाम, जील मंतरे, फक्रुद्दीन पुरवाला व विजया जाधव यांच्यासह आणखी तीन अशा एकूण अकरा सदनिकांचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. सुदैवाने चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक अजय भोसले करीत आहेत. मोबाईल शॉपी आणि इलेक्ट्रिक दुकानातील चोरी प्रकरणी सुखसागरनगर येथील प्रदीप दळवी (वय 38, रा. टिळेकरनगर, कोंढवा बुद्रुक) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दळवी यांचे सुखसागरनगर येथे श्रीनाथ मेडिकलच्या बाजूला समर्थ मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक शॉपी नावाचे दुकान आहे. गुरुवारी रात्री फिर्यादी त्यांच्या दुकानाला कुलूप लावून घरी गेले. दुसर्‍या दिवशी सकाळी ते घरी परतल्यानंतर त्यांना त्यांच्या दुकानामध्ये चोरी झाल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी त्यांच्या दुकानाच्या शटरचे कुलूप उचकडून दुकानातील वेगवेगळ्या कंपनीचे 25 मोबाईल व 20 हजार रुपयांची रोकड असा दोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नितीन शिंदे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT