पुणे

पुणे : उदय सामंत हल्लाप्रकरणी माजी नगरसेवकाला अंतरिम अटकपूर्व जामीन

अमृता चौगुले

पुणे : माजी मंत्री आणि शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या वाहनावर हल्ला केल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे आणि शहरप्रमुख गजानन थरकुडे यांना न्यायालयाने गुरुवारी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. सत्र न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी हा आदेश दिला. तीस हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर धनवडे आणि थरकुडे यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. पोलिसांना तपासात सहकार्य करावे, साक्षीदारांवर दबाव टाकू नये, आरोपपत्र दाखल होईपर्यंत प्रत्येक शुक्रवारी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात हजेरी लावावी, पोलिसांच्या पूर्व परवानगीशिवाय जिल्ह्याबाहेर जाता येणार नाही, अशा अटीही न्यायालयाने घातल्या आहेत.

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची मंगळवारी रात्री कात्रज चौकात सभा झाल्यानंतर तेथून जाणार्‍या सामंत यांच्या वाहनावर जमावाने हल्ला केला. याबाबत सामंत यांच्या वाहनचालकाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी शिवसेनेच्या सहा पदाधिकार्‍यांना अटक केली असून, धनवडे, थरकुडे यांच्यासह आठ ते दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी धनवडे व थरकुडे यांनी अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत सत्र न्यायालयात अर्ज केला होता.

या प्रकरणी राजकीय आकसातून शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांवर खोटी कारवाई करण्यात येत आहे. ही घटना घडली, तेव्हा अर्जदार घटनास्थळी उपस्थित नव्हते, असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने दोघांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. ठोंबरे यांच्यासह अ‍ॅड. हितेश सोनार व अ‍ॅड. शिवम पोतदार यांनी काम पाहिले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT