पुणे : पुढारी वृत्तसेवा: येरवडा वाहतूक शाखेकडून उड्डाणपुलाच्या कामामुळे हलक्या वाहनांवर काही प्रमाणात निर्बंध घालण्यात आले आहेत. 'येरवडा येथील गोल्फ क्लब चौका परिसरातील उड्डाणपुलाच्या खांबावर गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी गोल्फ क्लब चौकातून जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा,' असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस आयुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे.
आंबेडकर चौकातून गोल्फ क्लब चौकमार्गे शास्त्रीनगर चौकाकडे जाणारी दुचाकी व हलकी वाहने गोल्फ क्लब चौकातून डावीकडे वळून जीएसटी भवन येथून वळसा घालून गोल्फ क्लब चौकातून डावीकडे वळून शास्त्रीनगर चौकाकडे जातील. शास्त्रीनगर चौकाकडून गोल्फ क्लब चौकामार्गे आंबेडकर चौकाकडे जाणारी दुचाकी व हलकी वाहने गोल्फ क्लब चौकातून डावीकडे वळून पुलाला वळसा घालून पुढे गोल्फ क्लब चौकातून डावीकडे वळून आंबेडकर चौकाकडे जातील. शास्त्रीनगर चौकाकडून गोल्फ क्लब चौकमार्गे आंबेडकर चौकाकडे जाणार्या व आंबेडकर चौकाकडून शास्त्रीनगरकडे जाणार्या जड वाहतुकीस बंदी आहे.
…या पर्यायी मार्गांचा वापर करा !
शास्त्रीनगर चौकाकडून आंबेडकर चौकाकडे जाणारी वाहतूक शास्त्रीनगर चौक सरळ गुंजन चौक, पर्णकुटी चौकातून डावीकडे वळून महात्मा गांधी चौक तेथून आंबेडकर सेतूवरून तारकेश्वर चौक, चंद्रमा चौक, पुढे आळंदी रस्त्याने इच्छित स्थळी जावे. आंबेडकर चौकातून गोल्फ क्लब चौकमार्गे शास्त्रीनगर चौकाकडे जाणारी वाहतूक आंबेडकर चौक, सादलबाबा चौक, डावीकडे वळून गुंजन चौक, तेथून शास्त्रीनगर चौकमार्गे पुढे जावे.
हेही वाचा