पुणे; पुढारी वृत्तसेवा: सदनिकांच्या किमतींप्रमाणे मिळकतकराची आकारणी करण्यात येणार असून, आलिशान सदनिकाधारकांना कराचा अधिक भार सोसावा लागणार आहे. पहिल्या टप्प्यात 15 पैकी एका क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील साधारण 80 हजार मिळकतींना सुधारित मिळकतकर (कॅपिटल टॅक्स) आकारला जाणार आहे. महापालिकेकडून शहरात वाजवी भाडयाच्या दराने कर आकारणी केली जाते. त्यानुसार, जुन्या मिळकतींना कमी तर नवीन मिळकतींना जादा कर आहे. तर अनेक व्यासायिक मिळकतींच्या करातही फरक आहे.
त्यामुळे, शहरासाठी एकसमान कर आकारणी असावी, या उद्देशाने महापालिकेकडून भांडवली मुल्यावर आधारीत कर प्रणालीचा अभ्यास केला जात आहे. त्यासाठी, पालिकेने गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटीकल ऍड इकॉनॉमिक्स या संस्थेचे नेमणूक केली आहे.या संस्थेने आपला अहवाल नुकताच महापालिकेस सादर केला आहे.
याबाबत बोलताना महापालिका आयुक्त कुमार म्हणाले, सुरूवातीला 100 मिळकतींचा अभ्यास करण्यात आला, त्यात, महापालिकेकडे असलेल्या संबधित मिळकतीच्या माहितीनुसार, कर आकारणी करण्यात आली, तसेच प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून कर आकारणी करण्यात आली, त्यात, जवळपास दुप्पट फरक आढळून आला, त्यामुळे याचा सविस्तर अभ्यास होणे गरजेचे आहे. त्यामुळे, आता हा अभ्यास विस्तारीत स्वरूपात केला जाणार असून त्यासाठी 15 क्षेत्रीय कार्यालयातील कोणत्याही एका क्षेत्रीय कार्यालयाची निवड केली जाणार आहे.
त्यातील सुमारे 80 हजार मिळकतींचा अभ्यास केला जाणार आहे. त्यात, निवासी, व्यावसायिक, लहान सोसायट्या, मोठ्या सोसायट्या, बैठी घरे अशा सर्व प्रकारच्या मिळकतींचा समावेश असणार आहे. या अभ्यासातून पुढे येणार्या माहितीच्या आधारावर ही कर प्रणाली लागू केली जाणार आहे.
महापालिकेने दिलेल्या मिळकतकरामधील 40 टक्के सवलतींसदर्भात विविध संघटना, स्वयंसेवी संस्थांनी निवेदने दिली आहेत. यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत बैठक झाली आहे. त्यांनी राज्य शासनाबरोबर बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे याबाबत राज्य शासनाबरोबर बैठक झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल.
– विक्रम कुमार,