पुणे

पुणे : आरटीओच्या कारवाईत 21 खासगी बसेस दोषी

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: नाशिकमध्ये बस जळाल्याच्या घटनेमुळे पुणे आरटीओ अ‍ॅक्शनमोडमध्ये आले असून, पुण्यात रविवारी एकाच रात्रीत आरटीओच्या चार वायुवेग पथकांनी एकूण 60 खासगी बसची तपासणी केली. यात अधिकार्‍यांना 21 वाहने दोषी आढळली. या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. राज्यातील विविध ठिकाणी शनिवारी खासगी बसच्या अपघाताच्या तीन ते चार घटना घडल्या. यात एका ठिकाणी एसटी महामंडळाच्या बसला देखील आग लागल्याच्या घटनेचा समावेश होता.

नाशिकमध्ये झालेल्या खासगी बसच्या अपघातात 12 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. त्यामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आणि प्रशासकीय यंत्रणा जाग्या झाल्या. पुण्यातही रविवारी एकाच रात्रीत प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून 4 वायुवेग पथकांमार्फत धडक कारवाई करण्यात आली. आरटीओने पुणे-सोलापूर रस्ता, पुणे-नगर रस्ता आणि पुणे-कोल्हापूर रस्त्यावर यावेळी रात्रभरात 60 वाहनांची तपासणी केली. यात 21 वाहने दोषी आढळली, त्यांच्यावर आरटीओने दंडात्मक कारवाई करून या वाहनांच्या मालकांना मेमो देण्यात आले. 39 वाहने नियमात असल्याने त्यांना सोडून देण्यात आले.

नाशिक घटनेच्या पार्श्वभुमीवर पुण्यात कारवाईला सुरूवात करण्यात आली आहे. शहरातील सर्वच्या सर्व खासगी वाहतूक करणार्‍या बसची तपासणी करण्यात येणार आहे. यात दोषी आढळणार्‍या बसगाड्यांवर दंडात्मक आणि जप्तीचीकारवाई करण्यात येणार आहे.
                             – संजीव भोर, उपप्रादेशिक परिवह अधिकारी, पुणे

कारवाई झालेल्या ट्रॅव्हल्स कंपन्या
पुणे आरटीओच्या पथकांनी पुणे शहराबाहेरील प्रमुख रस्ते, शिवाजीनगर एसटी स्टँड, स्वारगेट परिसरात रस्त्यावर धावणार्‍या नॅशनल ट्रॅव्हल्स, त्रिमुर्ती ट्रॅव्हल्स, सफर ट्रॅव्हल्स सह विविध ट्रॅव्हल कंपन्यांच्या वाहनांवर कारवाई केली. ही कारवाई आणखी सुरूच राहणार असल्याचे आरटीओकडून सांगण्यात आले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT