संग्रहित छायाचित्र 
पुणे

पुणे : आपण मटण अन् बिर्याणीचे पैसे द्यायचे का? फुकट्या अधिकाऱ्याची खमंग चर्चा ऐकली का!

backup backup

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे पोलीस :"जर याचा काही हिशोब असेल तर पी आय ना सांगा..आपण आपल्याच हद्दीत पण पैसे द्यायचे का ?" "यापुर्वी आपण असे कधी घेतले नाही..आपण कॅश करायचो.."

"पे करून?.. तेवढं करेल तो..त्यात काय एवढं..नाही तर तेथील बीट अंमलदार कोण असेल त्याला सांगा… नाहीतरं मी सांगते पी आय ला आपल्या हद्दीतील गोष्टीसाठी कोणी पैसे पे करतं का ? मला माहिती नाही बाबा.."

हा संवाद आहे शहर पोलिस दलातील एक अतिवरिष्ठ पोलिस अधिकारी अन् कर्मचार्‍यामधला..पडलात की नाही विचारात…? जेव्हा थेट वरिष्ठ पोलिस अधिकारीच आपल्या कर्मचाऱ्याला त्यांच्या हद्दीतून खरेदी केलेल्या वस्तूंचे बिल देऊच नको, असे सांगत असतील तर नागरिक इतरांकडून काय चांगल्या पोलिसिंगची अपेक्षा ठेवणार? पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्याच्या संवादाचे ध्वनिमुद्रणच दै. पुढारीच्या हाती आले आहे.

त्याचे झाले असे की, शहर पोलिस दलातील एका पोलिस अधिकाऱ्याला बिर्याणी आणि मटणावर ताव मारण्याची इच्छा झाली.. मग काय मर्जीतल्या खास कर्मचाऱ्याला आदेश देण्यात आला. दस्तरखुद्द बड्या साहेबांचीच फर्माईश म्हटल्यावर त्यानेदेखील अधिकाऱ्याची मर्जी सांभळण्यासाठी आपल्या हद्दीत कोणत्या हॉटेलमध्ये काय-काय मिळते अन् ते किती चांगले आहे, याची जंत्रीच वाचायला सुरूवात केली.

आपण आपल्याच हद्दीत कोणत्या गोष्टीसाठी पैसे द्यायचे असतात काय ?

ऑर्डर करून झाल्यानंतर शेवटी विषय बिलाचा आला… साहेबाचीच ऑर्डर म्हटल्यानंतर पैशाचा विषय काढताना कर्मचाऱ्याची पाचावर
धारण बसली. शेवटी साहेबाने पैशाचे कसे असे विचारले. त्यावेळी कर्मचाऱ्याने आपण हॉटेलमधून खरेदी केल्यानंतर त्यांना पैसे देत असल्याचे सांगितले. मग काय ? 'आपण आपल्याच हद्दीत कोणत्या गोष्टीसाठी पैसे द्यायचे असतात काय ?' असे विचारले. बिचारा कर्मचारी बुचकळ्यात पडला.

अवैध धंदेवाले आणि वसुलीबहाद्दर पोलिसांचे लागेबंध काही नवे नाहीत. मात्र शहरात असे ही काही व्यवसायिक आहेत की, नियमानुुसार ते त्यांच्या व्यवसाय करत असतात. अशा व्यावसायिकांना वेठीस धरणे कितपत योग्य आहे, हा देखील सवाल या निमित्ताने निर्माण होतो आहे. अनेकदा संबधित पोलिस ठाण्याच्या हद्दीत तेथील वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्याची चलती असते. पोलिस ठाण्याच्या निरीक्षकाचा संपूर्ण आर्थिक डोलारा तो चालवत असतो.

मात्र अशा फुकटखाऊ पोलिस अधिकाऱ्याला चाप लावण्याचा प्रयत्न काही मोजके प्रामाणिक वरिष्ठ अधिकारी करीत असतात आणि त्यांनी अशा फुकट्यांची गांभिर्याने दखल घेत त्यांच्यावर कारवाई देखील केली आहे. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांचा निश्चितच पोलिस खात्यात दरारा राहिलेला आहे. असे असले तरी अशी प्रामाणिकपणे कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याएवढीच असल्याचे दिसून आले आहे. बहुसंख्य अधिकारीही अशा फुकट फौजदारांच्या फुकटेगिरीला साथच देताना दिसतात.

फुकट खाणारा अधिकारी आणि पोलिस कर्मचारी या दोघांत हद्दीत घेतलेल्या वस्तूंचे पैसे न देण्याबाबत झालेला हा संवाद.

अधिकारीः  येस.. बरं जास्त चांगली बिऱ्याणी कुठं आहे…?

कर्मचारीः एसपीची साजूक तुपातील बिर्याणी प्रसिद्ध आहे.

अधिकारीः बरं

कर्मचारीः साजुक तुपातील असते ती, त्यात जास्त कलर वैगेरे काही नसतो..चांगली असते.

पोलिस अधिकारीः आणखी जास्त चांगलं कुठं आहे ?

कर्मचारीः साहेब, तीच चांगलीये. साजुक तुपातली आहे

पोलिस अधिकारीः बरं ठिक आहे.. जर याचा काय हिशोब असेल तर पीआयला सांगून द्याल मी सांगितले म्हणून..का मी बोलू पीआयला ?

कर्मचारीः नाही करतो मी..त्यांना विनाकारण कशाला सांगायचं ?

पोलिस अधिकारीः नाही, पण कशाला त्याच्या हद्दीतील आहे तर आपण कशाला पैसे देत बसायचं तिथं ? आपल्या हद्दीत पण त्यांना पैसे द्यायचे का आपण… ?

कर्मचारीः आपण यापूर्वी असं कधी हे केलं नव्हतं त्यांना

अधिकारीः काय ?…

कर्मचारीः ठिक आहे मी पीआयशी बोलतो आणि करून घेतो

पोलिस अधिकारीः मग आधी काय करायचे तुम्ही ?

कर्मचारीः नाही. आपण कॅश करायचो.

पोलिस अधिकारीः पे करून…

कर्मचारीः हो ? पे करूनच करायचो…?

पोलिस अधिकारीः तेवढ करेल तो..मला बोलला होता त्या दिवशी कोणतं तरी हॉटेल आहे.. तेवढं करेल तो.. त्याच्यात काय एवढं ते…?

कर्मचारीः येस… मी सांगतो

पोलिस अधिकारीः नाही तर दुसरा कोणी असेल तिथला बीट अंमलदार तर त्याला सांगा.. पण ते जास्त नाही किंवा मी सांगते पीआयला.

कर्मचारीः नाही. मी बोलतो. आपण नका…

पोलिस अधिकारीः आम्ही त्या दिवशी फिरत असताना, तो बोलला होता मला.

कर्मचारीः हो…

पोलिस अधिकारीः आपल्या हद्दीत आहे तर त्याचे पैसे पे करायचे का आपल्या हद्दीतील कोणत्या गोष्टीसाठी कोणी पैसे पे करते का ? आय डोन्ट नो बाबा…?

कर्मचारीः यस, यस…

अधिकारीः दुसरं काही मिळतं का अजून आपल्याच हद्दीतलं ?

कर्मचारीः हो, मी पाहतो..

पोलिस अधिकारीः प्रॉन्झ वैगैरे काही वेगळं मिळतं का…? आपल्या हद्दीतच हवं बर का. ऑईली नको. जरा टेस्ट वैगेरे जशी ब्लू नाईलची बिर्याणी असते ना ? पण ती आपल्या हद्दीत नाही म्हणून नको म्हटलं. नंतर बघू…

कर्मचारीः मी पाहतो..मिळेल ते सर्व काही आणखी दुसरं काही पाठवू देऊ का..

पोलिस अधिकारीः बाकी काय नको..

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT