पुणे, पुढारी वृत्तसेवा: 'बीपीसीएल' या नामांकित कंपनीच्या पेट्रोल, डिझेल डेपोतून इंधन भरलेला टँकर डिलिव्हरी देण्यापूर्वी शेतामध्ये नेऊन इंधनाचा काळा बाजार करणार्या टोळीचा गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने पर्दाफाश केला. त्यानंतर आता संशयितरीत्या इंधन वाहतूक करणारे आणखी 12 टँकर ताब्यात घेतले आहेत. आत्तापर्यंत एकूण 13 टँकर ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यामुळे टोळीची पाळेमुळे खणण्यावर पोलिसांनी भर दिल्याचे दिसून येते. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून टँकरमधील पेट्रोल व डिझेल मोजण्याचे एकक म्हणून वापरण्यात येणारे एक ओरिजनल व ड्यूप्लिकेट असे दोन पितळी 'डिपरॉड' जप्त केले आहेत.
त्यामुळे या गुन्ह्याची व्याप्ती वाढली असून, बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. जप्त केलेल्या साहित्याचे न्याय वैज्ञानिक परीक्षणासाठी देण्यात आले आहे. विशेष म्हणजे इंधन डेपोचे सुरक्षा कवच भेदून काही टँकर असे दोन-दोन डिप रॉडच्या मदतीने पेट्रोल व डिझेलची चोरी करत असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. नुकतीच पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे पदाधिकारी यांनी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची गेल्या आठवड्यात भेट घेतली होती. पोलिसांच्या तपासावर समाधान व्यक्त करत, गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
सामाजिक सुरक्षा विभागाने 6 जुलै रोजी लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वळती गाव येथील एका शेतामध्ये ही कारवाई करण्यात आली होती. या वेळी रॅकेट चालविणारा बालाजी मधुकर बजबळकर (41), दत्तात्रय गजेंद्र बजबळकर (41, राहणार दोघे, आनंदनगर, माळवाडी) उत्तम विजय गायकवाड (31), अजिंक्य मारुती शिरसाठ (26, रा. लोणी काळभोर), साहिल दिलीप तुपे (22) यांना अटक करण्यात आली होती. तर त्यांच्या इतर साथीदारांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वळती आळंदी मातोबाची रस्त्याच्या गट क्रमांक 413 मध्ये मारुती कुंजीर यांच्या शेतात बेकायदेशीररीत्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (लोणी काळभोर) या डेपोमधून पेट्रोल व डिझेल भरलेल्या टँकरमधून इंधन काळ्या बाजाराने विक्री करण्याकरिता काढून देत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार, सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ निरीक्षक राजेश पुराणिक यांच्यासह पथकाने कारवाई केली. त्यानंतर इंधनाचा काळाबाजार करणार्या या रॅकेटचा पर्दाफाश झाला होता.
या वेळी एक टँकर जप्त करण्यात आला होता. मात्र, आता या प्रकरणात संशयीतरीत्या वाहतूक करणारे इतर 12 टँकर जप्त करण्यात आले आहेत. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक हे अधिक तपास करत आहेत.