कसबा पेठ, पुढारी वृत्तसेवा: आखाड महिन्याच्या रविवारी सर्वत्र आखाड पार्टीचे बेत आखले जातात. बुधवार (दि.28) पासून श्रावण महिन्याला प्रारंभ होत असल्याने खवय्या पुणेकरांनी शहरातील गणेश पेठेतील मासळी बाजार, जुना बाजारातील कोंबडी बाजारात ग्राहकांनी सकाळपासून दुकानांमध्ये गर्दी करण्यास सुरुवात केली होती. आखाडातील रविवार साजरा करण्यासाठी खवय्यांनी गणेश पेठेतील मासळी बाजारातील ओले बोंबील, पापलेट, बांगडा, वाम, सुरमई, कोंळबी घेण्यासाठी मोठी झुंबड केल्याचे रविवारी (दि.17) दिसून आले. बांगडा 220, पापलेट 1000 रु. किलोला दर असल्याचे गणेश पेठेतील मासळीविक्रेत्यांनी सांगितले.
जुना बाजार परिसरातील कोंबडी बाजारातील गावरान कोंबडी म्हणजे डीपी, आरआर, कडकनाथ, पिवर गावरान, काबेरी जातीच्या कोंबड्यांना बाजारात अधिक मागणी मिळताना दिसत होते. साधारण गावरान कोंबडी 400 रुपयांपासून व कोंबडा 500 ते 600 रुपयांपासून विक्री होताना दिसत होते. येथील कडकनाथ कोंबड्यांना विशेष मागणी आहे. त्यामुळे आजूबाजूच्या तालुक्यातील नागरिक येथील गावरान कोंबड्या खरेदीसाठी आठवडी कोंबडी बाजारात येत असतात. विक्रेत्यांनी जाळीच्या पिंजर्यात किंवा बांबूपासून बनविलेल्या पिजर्यांमध्ये कोंबड्या आणून बाजारात विक्रीस ठेवलेल्या दिसतात. ग्राहक प्रत्येक कोंबडी बारकाईने बघूनच खरेदी करताना दिसतात.
शहरातील पूर्वीपासून चालत आलेला हा आठवडी कोंबडी बाजार म्हणून प्रसिद्ध आहे. आखाडातील पार्टींसाठी तसेच नवस फेडण्यासाठी येथील गावरान कोंबड्यांना विशेष मागणी असते. कोंबडी बाजारामध्ये शहर व उपनगरांमधील कष्टकरी वर्ग, हॉटेल विक्रेते तसेच घरगुती ग्राहक पिवर गावरान कोंबडी खरेदीसाठी येत असतात.
– दत्ता साबळे, कोंबडी विक्रेते