पुणे; पुढारी वृत्तसेवा: आखाड पार्टी साजरी करताना झालेल्या भांडणातून मित्रावर वार करून त्याचा खून केल्याप्रकरणी दोघांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. ही घटना बुधवारी (दि 27) नवी पेठेतील गांजवेवाडी येथे घडली होती.
सँडी ऊर्फ संदीप सुरेंद्र नायर (वय 28, रा. बिबवेवाडी) आणि बंडू ऊर्फ सुधीर गौतम थोरात (वय 32, रा. सदाशिव पेठ) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी वैशाली गणपत जोरी (वय 30) यांनी फिर्याद दाखल केली आहे. आनंद ऊर्फ बारक्या गणपत जोरी (वय 32, रा. पर्वती दर्शन कॉलनी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील वर्षाराणी जाधव यांनी केली. तिघेजण बुधवारी रात्री नवी पेठेतील पूना हॉस्पिटलजवळ असलेल्या गांजवेवाडी येथील सागर हॉटेलच्या मागील बाजूस आखाड पार्टी साजरी करण्यासाठी गेले होते. तेथे तिघांनी दारू पिऊन जेवण केले, त्यानंतर त्यांच्यात वाद झाले. त्यानंतर संशयित आरोपींनी त्यांच्याकडील धारदार शस्त्राने आनंद याच्यावर वार केले. यात त्याचा मृत्यू झाला.
वार करणार्यास अटक
अतिक्रमणाची तक्रार दिल्याच्या गैरसमजातून एकावर कोयत्याने वार केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी सुरजितसिंग गजलसिंग भादा (वय 36) यास अटक केली. न्यायालयाने त्याला 2 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. याप्रकरणी आणखी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 25 वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. 26 जुलै 2022 रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास येरवडा परिसरातील शिवराज चौक परिसरात ही घटना घडली. फिर्यादी आणि आरोपी हे नात्याने चुलते व चुलतभाऊ असून त्यांच्यात घर व जमिनीवरून वाद सुरू आहेत.
या जागेवर महापालिकेकडून अतिक्रमण कारवाई करण्यात आली. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीमुळे ही कारवाई झाल्याच्या गैरसमजातून सुरजितसिंग याने फिर्यादींच्या घराजवळ येऊन शिवीगाळ केली. त्यावेळी 'कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले, असे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी सुरजितसिंग याला न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्याच्या तपासासाठी, गुन्ह्यातील इतर आरोपींना अटक करण्यासाठी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील योगेश कदम यांनी केली.
रोकड लंपास करणार्यास अटक
मालकाला देण्यासाठी दिलेली पाच लाखांची रोकड लंपास करणार्या आश्रफअली अमजदअली सैय्यद (वय 22, रा. वाघोली) यास लोणीकाळभोर पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला 31 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. याप्रकरणी, निखिल गुलाब कुंजीर (वय 29, रा. कुंजीरवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. 1 फेब—ुवारी 2022 रोजी हा प्रकार घडला. गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी सहाय्यक सरकारी वकील अजिंक्य शिर्के यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.
दरोडा प्रकरणात एकास अटक
लोहगावमधील एका ज्वेलर्सच्या दुकानात घुसून दागिने चोरल्याप्रकरणी आणखी एकाला विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एच. वानखेडे यांनी त्याला एक ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील पल्लवी काशीद यांनी केली.