पुणे

पुणे : आंबेगावातील 31 जलस्त्रोतांत दूषित पाणी

अमृता चौगुले

मंचर : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यातील 250 जलस्त्रोतांची तपासणी करण्यात आली असून, त्यामध्ये 31 जलस्त्रोतांमध्ये दूषित पाणी आढळल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. स्वच्छ, निर्जंतुक पाणी पुरवठ्याची सूचना संबंधित ग्रामपंचायतींना दिल्या असल्याची माहिती गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी दिली.

गावपातळीवर आरोग्य कर्मचारी, पाणी पुरवठा, स्वच्छता विभागाकडील जलरक्षक पाणी नमुने प्रत्येक महिन्याला घेतात. ते नमुने राज्य प्रयोगशाळेत तपासले जातात. एप्रिल महिन्यातील तपासणी अहवालात 31 जलस्त्रोतांतील पिण्याचे पाणी दूषित असल्याचे समोर आले. मे महिन्यातील तपासणी अहवाल अजून आला नाही. शुद्ध पाणीपुरवठ्याची जबाबदारी ग्रामपंचायतींची आहे. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाने पावसाळयापूर्वी स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र तळेघर, अडिवरे, डिंभा, निरगुडसर, धामणी यांच्या कार्यक्षेत्रातील गावे, वाडयावस्त्यांमध्ये दूषित पाणी आढळून आले आहे. जांभोरी गावठाण, नांदूरकीची वाडी, नवबौद्धवस्ती, माचेचीवाडी, काळवाडी, तळेघर येथील खांडेवाडी, फलोदे गावठाण, कुशिरे बुद्रुक गावठाण, दिग्गद गावठाण, आसाणेची जांभळेवाडी, आहुपेची जळकेवाडी, पिंपरगाणेचे घोनमाळ, तिरपाड गावठाण, आमोंडीची शिवखंडी, मेंगडेवाडी गावठाण, भराडी जि.प.शाळा, शिंगवे गावठाण, नागापूर गावठाण, रांजणी गावठाण, चांडोली बुद्रुक गावठाण, एकलहरे गावठाण, शिंदेवाडी, खडकी पिंपळगाव गावठाण, भगतमळा, एकतानगर, खडकी पुनर्वसन, अवसरी बुद्रुक गावठाण, शिरदाळे गावठाण, देवगांव गावठाण, दाभाडेवस्ती, माळवाडी या 31 ठिकाणी असलेल्या विहिरी, हातपंप, सार्वजनिक नळयोजना, बोअरवेल, सार्वजनिक टाकी या जलस्त्रोतांमध्ये दूषित पाणी आढळून आले आहे.

पाणी उकळून पिण्याचे आवाहन

ग्रामपंचायतींनी टीसीएल पावडरचा वापर करावा. नागरिकांनी पाणी उकळून घ्यावे, तसेच दूषित पाणीपुरवठा होणार नाही, याकडे आरोग्य विभागाचे कर्मचार्‍यांना लक्ष देण्यास सांगितल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT