पुणे

पुणे : आंबेगावात शेतीपंप, केबलचोरांचा धुमाकूळ

अमृता चौगुले

मंचर, पुढारी वृत्तसेवा : आंबेगावला शेतीपंप आणि केबलचोरांनी धुमाकूळ घातला आहे. याबाबत अनेकवेळा शेतकर्‍यांनी पोलिसांमध्ये तक्रारी केल्या. मात्र, तरीही चोरीच्या घटना थांबत नाहीत तसेच चोरही सापडत नसल्याने शेतकरी वैतागला आहे.

घोड नदीकाठावर दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर विद्युत पंप बसवून शेतकर्‍यांनी बागायत शेती केली आहे. मात्र, नदीकाठच्या मोटारी आणि केबलची चोरी वारंवार होत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. मागील दोन महिन्यांमध्ये काठापूर, जवळे, देवगाव या पूर्व भागातील अनेक शेतकर्‍यांच्या विद्युत मोटारीच्या केबल चोरीला गेल्या आहेत. तसेच कळंबला नुकतीच मोटारींची चोरी झाली आहे.

वारंवार चोरी होत असताना पोलिसांना चोरटे सापडत नसल्याने चोरांचे फावले आहे. चोरीमध्ये स्थानिक चोरट्यांचा सहभाग असल्याचीही चर्चा सुरू आहे. चोर्‍या रोखण्यासाठी काठापूर बुद्रुकच्या शेतकर्‍यांनी घोड नदी पाणी व्यवस्थापन कमिटीची स्थापना करून दोन सुरक्षारक्षक मानधनावर नेमले आहेत. त्यामुळे येणार्‍या कालखंडामध्ये शेतकर्‍यांना आपल्या मोटारींची आपणच सुरक्षा घ्यावी लागणार का, हाही प्रश्न आहे.

एका मोटारीची केबल चोरीस गेली, तर एका शेतकर्‍याचे अंदाजे 10 ते 15 हजार रुपयांचे नुकसान होते. जर मोटर चोरीस गेली तर मात्र शेतकर्‍यांचे तीस ते चाळीस हजार रुपयांचे नुकसान होते. त्यामुळे वर्षाला पाच ते सहा हजार रुपये खर्च करून मोटार व केबलची सुरक्षा करणे फायद्याचे आहे. त्यामुळे काठापूर बुद्रुकच्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन नदीकाठी मोटारी बसविलेल्या ठिकाणी सुरक्षारक्षकांची नेमणूक केली आहे.

                         – हनुमंत थोरात, अध्यक्ष, घोड नदी पाणी व्यवस्थापन कमिटी, काठापूर

SCROLL FOR NEXT