पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यंदा सर्वाधिक प्रवेश अमरावती विभागात 65.44 टक्के, तर सर्वाधिक कमी प्रवेश नागपूर विभागात 48.93 टक्के झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत येणार्या या प्रवेशप्रक्रियेत शासकीय आयटीआयमधील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा ओढा सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. आयटीआय प्रवेशाच्या जवळपास चार फेर्या पूर्ण झाल्या आहेत.
यामध्ये आतापर्यंत शासकीय आयटीआयमध्ये 71.97 टक्के जागांवर प्रवेश पूर्ण झाले आहेत. तर खासगी आयटीआयमध्ये केवळ 29.34 टक्के जागांवर एकूण 83 हजार 967 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याचे निदर्शनास आले आहे. शासकीय आयटीआयमध्ये 94 हजार 96 जागा आणि खासगी आयटीआयमध्ये 55 हजार 364 जागा अशा एकूण 1 लाख 49 हजार 460 जागा प्रवेशासाठी उपलब्ध होत्या.
प्रवेशप्रक्रियेंतर्गत आतापर्यंत चार फेर्या पार पडल्या आहेत. यामध्ये शासकीय आयटीआयमध्ये 67 हजार 723 विद्यार्थ्यांनी, तर खासगी आयटीआयमध्ये 16 हजार 242 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. अजूनही खासगी आयटीआयमधील जवळपास 39 हजार 122 जागा रिक्त आहेत. तर शासकीय आयटीआयमध्ये 26 हजार 373 जागा रिक्त असल्याचे दिसून येत आहे.
यंदा आयटीआयच्या एकूण प्रवेश क्षमतेच्या जवळपास दुपटीहून अधिक अर्ज आले होते. त्यामुळे यंदाही प्रवेशासाठी मोठी चुरस पाहायला मिळत आहे. शासकीय संस्थांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी खासगी संस्थांकडे वळतात, त्यामुळे शासकीय संस्थांमधील जागा भरल्यानंतर विद्यार्थ्यांना खासगी आयटीआयचा पर्याय उपलब्ध राहणार आहे.
विभागनिहाय प्रवेशाची आकडेवारी
अमरावती विभाग
जागा प्रवेश टक्के
18500 12107 65.44
औरंगाबाद विभाग
20820 11831 56.83
मुंबई विभाग
20252 13259 65.47
नागपूर विभाग
28436 13913 48.93
नाशिक विभाग
29764 15164 50.95
पुणे विभाग
31688 17691 55.83
प्रवेशाच्या फेर्या विद्यार्थिसंख्या
पहिली प्रवेश फेरी 40074
दुसरी प्रवेश फेरी 17147
तिसरी प्रवेश फेरी 16406
चौथी फेरी 10340
एकूण 83 हजार 967