पुणे

पुणे : अपहरण करून मागितली 20 लाख खंडणी; बाथरूमच्या बहाण्याने गाठले पोलिस ठाणे

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: मराठी मुलींचे संरक्षण करण्याची जबाबदारी आमची आहे, असे म्हणून एका स्वयंघोषित भाईने ऑफिसमधील तरुणीसोबत चॅट करतो, या कारणावरून भेटायला बोलावून साथीदाराच्या मदतीने तरुणाचे अपहरण केले. अपहरणानंतर त्याच्याच गाडीतून मारहाण करत तरुणाला कोपरगावला नेले. फोन पेद्वारे बँक खात्यातून पैसे काढून घेऊन 20 लाखांची खंडणी मागितली. मात्र, संबंधित तरुणाने प्रसंगावधान दाखवत बाथरूमच्या बहाण्याने स्वत:ची सुटका करून घेत थेट शिर्डी पोलिस ठाणे गाठले.

या प्रकरणी लहू विष्णू जाधव (वय 29, रा. अहमदनगर), महेश भाऊसाहेब कोटमे (वय 27, रा. नाशिक) आणि मंगेश माणिक भाबड (वय 37, रा. नाशिक) या तिघांना शिर्डी पोलिसांनी अटक करून पुढील तपासासाठी लोणीकंद पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या प्रकरणी वाकड येथे राहणा-या एका 33 वर्षांच्या तरुणाने लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार खराडी बासपास येथे 17 ऑगस्ट रोजी घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण शहरातील एका खासगी कंपनीत काम करतो. त्याच्याच कंपनीत काम करणार्‍या एका तरुणीसोबत तो बोलत होता. मोबाईलवर व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून बोलल्याले संभाषण होते. दरम्यान, आरोपी लहू त्या तरुणीचा मित्र आहे. फिर्यादीला लहूने फोन करून तिच्या सोबत चॅटिंग करू नको, असे सांगून खराडी येथे भेटायला बोलावले. त्यानुसार फिर्यादी गेले असताना त्यांच्या चारचाकीत लहू व महेश बसले. 'मुलींचे संरक्षण करणे ही माझी जबाबदारी आहे,' असे सांगून लहू फिर्यादींना हॉटेलमध्ये घेऊन गेला. तेव्हा त्यांच्याकडून फोन पेद्वारे 17 हजार रुपये घेतले. त्यांना मारहाण केली.

त्यानंतर 20 लाख रुपये दे, नाही तर तुझी गाडी नावावर करून दे, असे म्हणून फिर्यादीची कारची चावी व क्रेडिट कार्ड वापरून मॉलमध्ये खरेदी केली. त्यानंतर फिर्यादीच्या गाडीत त्यांना कोपरगाव येथे आणले. तेथे त्यांना डांबून ठेवले असताना त्यांनी बाथरूमला जाण्याचा बहाणा केला. त्यांची नजर चुकवून स्वत:ची सुटका करून घेतली व शिर्डी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार केली. पोलिसांनी तिघांना पकडून पुणे पोलिसांच्या हवाली केले. मात्र हा सर्व प्रकार घडल्याबाबत तरुणीला काहीच माहिती नसल्याचेदेखील पोलिसांनी सांगितले. पोलिस उपनिरीक्षक रवी दळवी तपास करीत आहेत.

जीपीएसमुळे आरोपी गजाआड
फिर्यादी तरुणाच्या कारला जीपीएस लावला होता. त्याने स्वत:ची सुटका करून घेतल्यावर रिक्षातून पळून तो थेट शिर्डी पोलिसाकडे पोहचला. त्याने सर्व हकिकत सांगितली. त्यांनी त्याच्या कारचे लोकेशन तपासले तेव्हा ती त्यांच्याच दिशने येत असल्याचे आढळून आले. त्यांनी तातडीने तिघांना ताब्यात घेतले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT