पुणे; पुढारी वृत्तसेवा: लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची 102 वी जयंती सोमवारी शहरात मोफत आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर यांसह विविध सामाजिक उपक्रम घेऊन साजरी करण्यात आली. काही ठिकाणी पारंपरिक ढोल-ताशांचे वादन झाले. तर सायंकाळनंतर ठिकठिकाणी भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. रात्री उशिरापर्यंत डीजेच्या तालावर निघालेल्या मिरवणुकीत तरुणाईने जल्लोष केला.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शहरात सकाळपासूनच जल्लोषाचे वातावरण होते. विविध संस्था, संघटनांनी अण्णा भाऊ साठेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सारसबाग जवळील मित्रमंडळ चौकांतून अनेक संघटनांनी डीजे लावून मिरवणुका काढल्या. या मिरवणुकात लहान मुले, महिला, पुरुषांनी हिंदी, मराठी गाण्यातील संगीतावर नृत्य करत जल्लोष केला. रात्री उशिरापर्यंत शांततेत मिरवणूक सुरू होती.
मोफत आरोग्य तपासणी शिबिर
दलित स्वयंसेवक संघ व अण्णा भाऊ साठे स्मारक संस्था यांच्या वतीने पुना शिरोजीकल इन्स्टिट्यूट ब्लड सेंटर यांच्या मदतीने अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. दलित स्वयंसेवक संघाचे माजी संघ प्रमुख दादासाहेब सोनवणे, सुजित रणदिवे, चंद्रशेखर शिंदे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे, वर्षा साठे, प्रियंका शेंडगे-शिंदे, भीमराव साठे, ज्येष्ठ साहित्यिका सुभा लोंढे यांसह मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर पारंपरिक वाद्यवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.