पुणे; पुढारी वृत्तसेवा: आरटीओ कार्यालयातील नामांकित कंपनीची इंटरनेट सेवा गेल्या तीन दिवसांपासून बंद होती. त्यामुळे कार्यालयातील कामकाज ठप्प झाले होते. अखेर शनिवारी (दि. 6) दुपारपासून ही सेवा पूर्ववत झाली. सध्या सरकारी कार्यालयांमधील सर्वच कागदपत्रांची कामे शासनाने ऑनलाइन केली आहेत. अगदी छोट्यातील छोटे काम देखील ऑनलाइनच करावे लागत आहे. यामुळे इंटरनेट सेवा किंवा वेबसाइटचा सर्व्हर डाऊन झाला की नागरिकांच्या नाकीनऊ येते. आरटीओमध्ये तर सातत्याने इंटरनेट सेवा किंवा एनआयसी या वेबसाइटचा सर्व्हर डाऊन झालेला असतो. मागच्या महिन्यात देखील असाच त्रास नागरिकांना झाला होता.
गेले तीन दिवस देखील नागरिकांना आरटीओतील इंटरनेट सेवा बंद असल्याचा मोठा त्रास झाला. पुणे आरटीओ कार्यालयात नवीन लायसन्स काढणे, कर्जाचा बोजा चढवणे-उतरवणे, लायसन्सचे नूतनीकरण, डुप्लिकेट लायसन्स, रिक्षाचे परमिट तसेच वाहन ट्रान्सफरच्या कामासाठी आलेल्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. या वेळी आरटीओतील कर्मचारी लॅपटॉप आणि डोंगलच्या साहाय्याने किरकोळ कामे करण्याचा प्रयत्न करीत होते. ते काम देखील कासवगतीने सुरू होते. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाया गेला. तीन दिवस कामासाठी नागरिकांना वारंवार खेपा माराव्या लागल्या.
आरटीओ कार्यालय परिसरात मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे येथे सुरू असलेल्या खोदकामामुळे सातत्याने इंटरनेट सेवा बंद होत आहे. बीएसएनएलची सेवा या वेळी खंडित झाल्यामुळे कार्यालयात इंटरनेटची सेवा बंद झाली. आम्ही याबाबत संबंधित विभागाकडे तक्रार केल्यानंतर शनिवारी दुपारपासून ही सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.
– डॉ. अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे