पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीची गुणवत्ता यादी बुधवारी जाहीर करण्यात आली. पहिल्या फेरीत 42 हजार 709 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला आहे. दोनच दिवसांमध्ये 13 हजार 254 विद्यार्थ्यांनी कॅपमधून, तर 5 हजार 282 व्यवस्थापन कोट्यातून अशा एकूण 18 हजार 536 विद्यार्थ्यांनी अकरावीसाठी प्रवेश घेतला असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील 317 कनिष्ठ महाविद्यालयांतील 1 लाख 11 हजार 430 जागा प्रवेशांसाठी उपलब्ध आहेत.
पहिल्या फेरीत 1 लाख 2 हजार 69 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यातील 69 हजार 124 विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरून प्रवेश अर्जाचा भाग दोन भरला. त्यापैकी 42 हजार 709 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला आहे. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना शनिवारी सायंकाळपर्यंत प्रवेश घेण्याची संधी देण्यात आली आहे. पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे अनिवार्य आहे. पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेणार्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीसाठी प्रतिबंध करण्यात येईल.