पुणे

पुणे : अकरावीसाठी 35 हजारांवर पसंतीक्रम; 97 हजारांवर विद्यार्थ्यांची नोंदणी

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी महाविद्यालयांचे पसंतीक्रम म्हणजेच अर्जाचा दुसरा भाग भरण्याला 22 जुलैपासून सुरुवात झाली. रविवारीपर्यंत 35 हजार 68 विद्यार्थ्यांनी आवडत्या महाविद्यालयांचे पर्याय नोंदवले आहेत. त्याचबरोबर 4 हजार 574 विद्यार्थ्यांनी कोटा पद्धतीसाठी अर्ज दाखल केले. केंद्रीय अकरावी ऑनलाइन प्रवेश समितीद्वारे अकरावी प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाल्याने आता प्रवेश प्रक्रियेला गती मिळाली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील 312 महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी 1 लाख 7 हजार 960 जागा उपलब्ध आहेत. या जागांपैकी 23 हजार 921 जागा कोटा पद्धतीने भरण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी किमान एक, तर कमाल 10 महाविद्यालयांचे पर्याय भरता येणार आहेत. आणखी काही दिवस महाविद्यालयांचे पर्याय भरण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी हीींिीं:/र्/िीपश.11ींहरवाळीीळेप.ेीस.ळप या वेबसाइटवर संपर्क साधावा, असे आवाहन समितीद्वारे करण्यात आले आहे.

प्रवेशप्रक्रिया दृष्टिक्षेपात

महाविद्यालये- 312
जागा- 1,07,990
अर्ज नोंदणी- 97,245
ऑनलाईन पडताळणी (ऑटो-व्हेरिफाईड) अर्ज- 38,723
केंद्रावर जाऊन पाडताळणी- 32523
अर्ज लॉक- 75,650

SCROLL FOR NEXT