पुणे

पुणे : अकरावी प्रवेशासाठीच्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी आज

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठीच्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी आज सोमवारी (दि.5) सकाळी दहा वाजता जाहीर होणार आहे. या प्रवेश यादीत महाविद्यालय जाहीर होणार्‍या विद्यार्थ्यांना गुरुवारपर्यंत (दि.8) महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यावा लागणार आहे. तीन नियमित फेर्‍यांमध्ये जागा जास्त उपलब्ध असूनही कमी विद्यार्थ्यांचे प्रवेश जाहीर झाले. त्यामुळे विशेष फेरीच्या यादीत नेमके काय होणार, याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले आहे.

अकरावी केंद्रीय प्रवेश समितीद्वारे पुणे – पिंपरी चिंचवडसह मुंबई, नागपूर, अमरावती, नाशिक या महानगर क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानुसार या प्रवेश प्रक्रियेत अर्जातील भाग एक आणि दोन पूर्ण भरून अर्ज नव्याने लॉक करून संमती देणार्‍या विद्यार्थ्यांचाच विशेष फेरीतील प्रवेशाच्या यादीत समावेश केला जाणार आहे.

पुणे-पिंपरी चिंचवडमधील कॅप प्रवेश प्रक्रियेसाठी 93 हजार 906 जागा असून, त्यासाठी 78 हजार 361 विद्यार्थ्यांनी पूर्ण अर्ज भरले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे प्रवेश यादीकडे लक्ष लागले आहे. त्यासोबतच कोटांतर्गत प्रवेशाची यादीही प्रसिद्ध केली जाणार आहे. या विद्यार्थ्यांनाही 8 सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेणे अनिवार्य राहणार आहे. प्रवेशाच्या तिन्ही फेर्‍यांमध्ये केवळ 45 हजार 487 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. आत्तापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना पसंतीचे महाविद्यालय मिळूनसुद्धा त्यांनी प्रवेश घेण्याचे टाळले आहे. त्यामुळे विशेष फेरीतील प्रवेशासाठी चुरस वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील फेरी 9 सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

दृष्टिक्षेपात प्रवेश प्रक्रिया
एकूण महाविद्यालये- 315
एकूण प्रवेशक्षमता – 110990
एकूण नोंदणी – 105910
कोटा प्रवेशक्षमता – 17084
कोटांतर्गत प्रवेश – 7971
कॅप प्रवेशक्षमता – 93906
कॅप अंतर्गत अर्ज -73361
एकूण प्रवेश – 45487
रिक्त जागा – 65503

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT