पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठीची तिसरी यादी सोमवारी (दि. 22) जाहीर होणार आहे. या प्रवेश यादीत महाविद्यालय जाहीर होणार्या विद्यार्थ्यांना बुधवारी 24 ऑगस्टपर्यंत प्रवेश घ्यावा लागणार आहे. दुसर्या फेरीत जागा जास्त उपलब्ध असूनही कमी विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला होता. त्यामुळे तिसर्या यादीत नेमके काय होणार? याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवडमधील कॅप प्रवेश प्रक्रियेसाठी 86 हजार 416 जागा असून, त्यासाठी 78 हजार 604 विद्यार्थ्यांनी पूर्ण अर्ज भरले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे प्रवेश यादीकडे लक्ष लागले आहे. त्यासोबतच कोटांतर्गत प्रवेशाची यादीही प्रसिद्ध केली जाणार आहे. या विद्यार्थ्यांनाही 24 ऑगस्टपर्यंत प्रवेश घेणे अनिवार्य राहणार आहे. प्रवेशाच्या दोन्ही फेर्यांमध्ये केवळ 40 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना पसंतीचे महाविद्यालय मिळूनसुध्दा त्यांनी प्रवेश घेण्याचे टाळले आहे. त्यामुळे तिसर्या फेरीतील प्रवेशासाठी चुरस वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रिया दृष्टिक्षेपात
एकूण महाविद्यालये – 308
एकूण प्रवेश क्षमता – 1,09,790
एकूण नोंदणी – 1,04,990
कोटा प्रवेशक्षमता – 23,374
कोटांतर्गत प्रवेश – 6,976
कॅप प्रवेशक्षमता – 86,416
कॅपअंतर्गत अर्ज – 78,604