पुणे : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने आयोजित केलेल्या विविध रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून गेल्या सहा महिन्यांत 850 बेरोजगारांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला आहे. त्यामुळे आता या विभागाचे महत्त्व हळूहळू वाढू लागले आहे. कोरोनानंतर आता सर्व परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. त्यामुळे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने रोजगार मेळावे आयोजित करण्याचे प्रमाण गेल्या सहा महिन्यांपासून चांगलेच वाढले आहे.
या विभागामार्फत आयोजित करण्यात येत असलेल्या रोजगार मेळाव्यास चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यानुसार सहा महिन्यांत या विभागामार्फत चार रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले होते. या मेळाव्यात शहर आणि जिल्ह्यातील सुमारे 68 उद्योजक सहभागी झाले होते. वास्तविक पाहता विविध कलाकौशल्य असलेल्या नागरिकांसाठी या मेळाव्याच्या माध्यमातून 8 हजार 919 रिक्तपदे भरण्यात येणार होती. या चारही मेळाव्यात एकूण 5 हजार 370 उमेदवार सहभागी झाले होते. त्यापैकी 850 उमेदवारांना चांगल्या वेतनाबरोबरच कायमस्वरूपी नोकरी मिळाली आहे. त्यामुळे हळूहळू त्यांचे जीवनमान उंचावले जाणार आहे.
याबाबत माहिती देताना या विभागाचे अधिकारी प्रशांत नलावडे म्हणाले, 'या विभागाच्या वतीने चालू वर्षात सुमारे चार रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये 850 उमेदवारांना नोकरी मिळाली आहे.'