पिंपरी; पुढारी वृत्तसेवा: श्रावण महिन्याला सुरुवात झाल्याने पिंपरी येथील लाल बहादूर शास्त्री भाजीमंडई व मोशी येथील उपबाजार समितीमध्ये भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले. सध्या पावसाने उघडीप दिल्याने भाज्यांची आवक काही प्रमाणात वाढली होती. मात्र, श्रावण महिन्यात सण-उत्सव असल्यामुळे भाजीपाल्यांची मागणी वाढली होती. परिणामी सर्व पालेभाज्या व फळभाज्यांच्या दरात वाढ झाल्याचे चित्र दिसून आले. बाजारात भूईमुग शेंग, रताळी, शेपू, कोथिंबीर व मेथीच्या दरात वाढ झाली होती. घाउक बाजारात पंधरा ते वीस रूपये दराने गड्डीची विक्री झाली. तर, भुईमूगाची शेंग चाळीस ते पन्नास रूपये किलो दराने विक्री होत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.
तसेच, कांद्याची आवक 347 क्विंटल झाली होती. तर, बटाट्याची 822, लिंबांची आवक 23 क्विंटल झाली होती. टोमॅटोची आवक गेल्या आठवड्यापेक्षा 17 क्विंटलने वाढली असून, 352 क्विंटल एवढी आवक झाली होती. तर, काकडीची 159 क्विंटल एवढी आवक झाली होती. घाउक बाजारात टोमॅटोला 15 ते 18 रूपये किलो तर काकडीला 15 ते 16 रुपये किलो एवढा भाव होता. फळभाज्यांची आवक 2974 क्विंटल तर फळाची आवक 230 क्विंटल एवढी झाली आहे. पालेभाज्यांची 30 हजार 200 गड्डयांची आवक झाली होती.
झेंडूची फुले, बेलाच्या पानांना मागणी
श्रावण सुरू झाल्याने घरोघरी महादेवाच्या पुजेसाठी लागणारी झेंडुची फुले, केळीची खुंट आणि बेलाच्या पानांना ग्राहकांची अधिक मागणी होती. बाजारात झेंडुच्या पिवळ्या गोंड्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली होती. घाउक बाजारात तीस ते चाळीस रूपये दराने तर किरकोळ बाजारात साठ ते सत्तर रूपये दराने फुले मिळत होती. साबळेवाळी, मंचर, करंदी, केंदुर व शिरूर येथून फुलांची आवक झाली होती. केळीची चार खुंट 50 ते 80 रुपयांना तर बेलाची पानांचा वाटा 20 ते 30 रुपयांना मिळत होता.
पिंपरी भाजी मंडईतील भाव
पालेभाज्या दर
पालक 25
कोथिंबीर 30
मेथी 25
शेपू 25
कांदापात 20
पुदिना 25
फळभाज्यांचे किलोचे भाव
कांदा 30-35
बटाटा 30-35
लसूण 50 – 60
भेंडी 60
गवार 65-75
टोमॅटो 30
दोडका 50-60
हिरवी मिरची 60
कोल्हापुरी मिरची 70
दुधी भोपळा 45-50
लाल भोपळा 40
काकडी 30 – 35
कारली 60 -70
पडवळ 60
फ्लॉवर 40
कोबी 45
वांगी 35 – 40
भरताची वांगी 45-50
शेवगा 50-55
गाजर 25 – 30