पुणे

पिंपरी : शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीमुळे पालिका निवडणुकीत नवीन समीकरण

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शिवसेना व संभाजी ब्रिगेड एकत्र येणार असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे आता पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत नवीन समीकरण दिसणार आहे. पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना व संभाजी ब्रिगेड एकत्र येणार असल्याची घोषणा केली. याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, पक्षाचे प्रवक्ते गंगाधर बनबरे तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई उपस्थित होते. महाराष्ट्रात सध्या प्रादेशिक पक्ष संपवून टाकण्याचे कट कारस्थान सुरू आहे. या पार्श्वभूमवीर शिवसेनेत या लढवय्या सहकार्‍यांचे मी स्वागत करतो. प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी समविचारी पक्षांनी, व्यक्तींनी एकत्र येण्याची गरज आहे, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेत शिवसेनेचे नऊ नगरसेवक होते. शिवसेनेच्या ताकतीला संभाजी ब्रिगेडची जोड मिळणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये संभाजी ब्रिगेडची चांगली ताकद आहे. त्यामध्ये अनेक जण डाव्या, समाजवादी व पुरोगामी विचाराचे आहेत. या विचारधारेचे लोक शिवसेनेबरोबर जोडले जातील.त्यामुळे नवीन समीकरण उदयास येणार आहे.

शिवसेना व संभाजी ब्रिगेड एकत्र आल्याची बातमी अतिशय आनंदाची आहे. शिवसेनेचा हिंदुत्वाचा विचार संभाजी ब्रिगेडला पटला आहे. येणार्‍या काळात शिवसेना व संभाजी ब्रिगेड एकत्र येऊन पिंपरी चिंचवडमध्येही अतिशय चांगले काम करतील असा मला
विश्वास आहे.
                                                    – अ‍ॅड. सचिन भोसले, शहरप्रमुख, शिवसेना

आज महाराष्ट्राच्या राजकारणात संभाजी ब्रिगेड व शिवसेना युतीची घोषणा करण्यात आली याचा संभाजी ब्रिगेडचा शहराध्यक्ष म्हणून मनस्वी आनंद झाला आहे. येणार्‍या काळात शहरामध्ये शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून काम करू. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रत्येक निवडणुकीत संभाजी ब्रिगेड व शिवसेना युतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू. पुरुषोत्तम खेडेकर व प्रबोधनकार ठाकरे यांना अभिप्रेत असणारे समाजकारण व राजकारण आम्ही करणार आहोत.
                                                  – प्रवीण कदम, शहराध्यक्ष, संभाजी ब्रिगेड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT