पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शाहूनगर ते केएसबी चौकदरम्यान सायकल ट्रॅकचे फक्त बोर्ड दिसत असून, सायकल ट्रॅक कोठेच दिसत नाहीत. या ठिकाणीच्या सायकल ट्रॅक वाहने उभी करण्यात येत आहेत. त्यामुळे कुठे आहे सायकल ट्रॅक ? असा प्रश्न नागरिकांना
पडला आहे. पालिकेने नागरिकांनी जास्तीत जास्त सायकलचा वापर करावा यासाठी सायकल ट्रॅक तयार केले आहेत. मात्र, प्रत्यक्ष पाहता हा सायकल ट्रॅकचा प्रयोग फसला आहे.
काही भागात सायकल ट्रॅक वापरण्या योग्य आहेत; पण काही ठिकाणी नाही. सायकल ट्रॅकची रूंदी ही सर्वत्र एकसारखी नाही. कधी कधी तर तो ट्रॅक मधेच गायब होतो. या ट्रॅकवर दुचाकी स्वयंचलित वाहनांना मज्जाव करण्यासाठी कोणतीही सक्षम यंत्रणा नाही. सायकल ट्रॅक आणि फूटपाथ हे अगदी जवळ बनविले गेल्याने आणि एकाच पातळीत असल्याने चालणारे नागरिक सहज सायकल ट्रॅकवर येतात.