पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने महापालिका शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी शैक्षणिक वार्षिक नियोजन तयार करण्यात आले आहे. 20 मुद्दयांवर आधारित हे नियोजन असून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे, अशी माहिती महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी दिली.
महापालिका शाळा अन्य खासगी शाळांच्या तुलनेत मागे पडू नये, यासाठी महापालिका शिक्षण विभागाकडून विशेष प्रयत्न केले जात आहे. त्याचा प्रयत्नाचा एक भाग म्हणून वर्षभराच्या शैक्षणिक नियोजनाची आखणी करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मुलांच्या इंग्रजी भाषेच्या अभ्यासात सुधारणा व्हावी, यासाठी इंग्रजी अध्ययन समृद्धी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षांना अनुसरुन तयारी करुन घेण्यासाठी 'मिशन शिष्यवृत्ती' हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. शिक्षक सक्षमीकरण, अध्यापन तंत्रज्ञानाचा वापर, अध्यापनात विविध शैक्षणिक साधनांचा वापर, पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धा, दर 15 दिवसाला शाळांच्या भेटी घेऊन शैक्षणिक गुणवत्तापूर्ण उपक्रमांची माहिती घेणे, भौतिक सुविधांची माहिती घेणे आदी बाबींवर भर दिला जाणार आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध स्पर्धांचे आयोजन, विद्यार्थी हस्ताक्षर स्पर्धा, विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर निश्चिती व उपचारात्मक कार्यक्रम, 40 शिक्षक मित्र तयार करणे, शैक्षणिक गुणवत्ता कक्षाची उभारणी, प्रत्येक प्रभागामध्ये मॉडेल स्कूल तयार करणे, सुसज्ज शिक्षक प्रशिक्षण हॉल तयार करणे, सर्व शाळांची दुरुस्ती, रंगकाम, अद्ययावत स्वच्छतागृह तयार करणे, अग्निशामक यंत्रणा बसवणे आदी बाबींवर देखील या नियोजनात भर देण्यात आला आहे.
स्वच्छ व सुंदर शाळा स्पर्धा, क्रीडांगण व क्रीडा साहित्याने शाळा परिपूर्ण करणे, मुख्याध्यापकांचा गट तयार करुन शाळेत पालकांचा सहभाग वाढविणे, लोकसहभागावर भर आणि सोशल मिडियाच्या माध्यमातून महापालिका शाळांची प्रसिद्धी करणे आदी उपक्रमांचा या नियोजनात समावेश केला आहे.