पुणे

पिंपरी शहराला लवकरच अतिरिक्त पाणीपुरवठा; निघोजे अशुद्ध जल केंद्राचा वीजपुरवठा सुरू

अमृता चौगुले

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा: महापालिकेच्या वतीने आंद्रा धरण योजनेतून निघोजे, तळवडे येथून इंद्रायणी नदीपात्रातून 100 एमएलडी पाणी उचलण्यात येणार आहे. अशुद्ध जलउपसा केंद्राचा वीजजोड नुकताच सुरू करण्यात आला आहे. त्याची चाचणीही यशस्वी झाली असून, आठवड्याभरात चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रास वीजपुरवठा केला जाणार असून, सप्टेंबर महिन्याअखेरीस शहराला 100 एमएलडी अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे.

दररोज पाणीपुरवठ्याचे केवळ आश्वासन :
आंद्रा योजनेतून शहराला 100 एमएलडी अतिरिक्त पाणी लवकरच उपलब्ध होईल. त्यानंतर संपूर्ण शहराला दररोज पाणीपुरवठा केला जाईल, असे आश्वासन गेल्या दीड वर्षापासून सत्ताधारी तसेच, पालिका प्रशासनाकडून दिले जात आहे. मात्र, अद्याप शहराला अतिरिक्त पाणी उपलब्ध झालेले नाही, त्यामुळे नागरिकांसह विविध राजकीय पक्षांकडून संताप व्यक्त केला जात आहे. पवना धरण 100 टक्के भरलेले असताना शहरात दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. दररोज पाण्यासाठी शहरातून मागणी वाढत आहे.

आठ किलोमीटरची जलवाहिनी
आंद्रा योजनेतून पाणी आणण्यासाठी निघोजे, तळवडे येथे अशुद्ध जलउपसा केंद्र व पंपिंग स्टेशन उभारण्यात आले आहे. तेथून सुमारे 8 किलोमीटर अंतराची जलवाहिनी चिखलीपर्यंत टाकण्यात आली आहे. चिखली जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले. तेथून पाणी शुद्ध करून ते परिसरात पुरविले जाणार आहे. परिसरात जलवाहिनी टाकून टाक्या बांधण्यात आल्या आहेत. ही सर्व कामे अंतिम टप्प्यात असताना पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांना वीजपुरवठ्यासाठी जोड घेण्याची आवश्यकता असल्याचे लक्षात आले.

त्यानंतर घाईघाईत निघोजे व चिखली केंद्रास अतिउच्चदाब वीजपुरवठा करण्यासाठी दोन वेगवेगळ्या निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यासाठी किमान 8 महिन्यांच्या कालावधी लागणार आहे. ते काम पूर्ण होईपर्यंत तात्पुरता वीजजोड घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार निघोजे केंद्रास नुकताच वीजजोड देण्यात आला आहे. त्याद्वारे तेथील उपसा मशिन आणि पंपिंग स्टेशनची चाचणी घेण्यात आली. ती यशस्वी झाली आहे. पुढील आठवड्याभरात चिखली जलशुद्धीकरण केंद्रास वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. त्यानंतर आठवडाभर सर्व मशिनवर चाचणी घेण्यात येणार आहे.

पवना धरण फुल्ल; तरीही शहरात दिवसाआड पाणी :
पवना धरण 100 टक्के भरले आहे. अशी सकारात्मक स्थिती असूनही पिंपरी-चिंचवड शहरात दोन दिवसांत एकदाच पाणी येत आहे. निगडीतील सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्र आणि रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रांची यंत्रणा अद्ययावत न केल्याने संपूर्ण शहराला दररोज पाणीपुरवठा करता येणार नसल्याने पाणीपुरवठा विभागाचे अपयश झाकण्यासाठी तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 25 नोव्हेंबर 2019 पासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला.

त्यास पावणेतीन वर्षे झाले तरी, शहराला अतिरिक्त पाणी अद्याप मिळालेले नाही. उलट, काही भागात कमी वेळ पाणी येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. पवना धरणातून दररोज 480 ते 490 एमएलडी पाणी उचलले जात आहे. त्यापेक्षा अधिक पाण्याचा उपसा व शुद्धीकरण करण्यासाठी पालिकेकडे यंत्रणा उपलब्ध नाही. तसेच, एमआयडीसीकडून शुद्ध पाणी घेतले जात आहे. इतके पाणी शहराला पुरत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पवना धरण 100 टक्के भरलेले असले तरी, शहराला दिवसाआड पाणी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पाण्यावरून राजकीय श्रेयवाद :
राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात पिंपरी-चिंचवड महापालिकेची सत्ता द्या. संपूर्ण शहराला दररोज भरपूर पाणी देऊ, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिले. तर, आंद्रा पाणी योजनेला गती देऊन ते काम सत्ताधारी भाजपने पूर्ण केले. त्यामुळे शहराला दररोज पाणी मिळणार, असा दावा भाजपकडून केला जात आहे. पाण्यावरून शहरात राजकारण रंगले असून, येत्या महापालिका निवडणुकीत हा मुद्दा गाजणार असल्याचे दिसत आहे.

आठवड्याभरात चिखली जलशुद्धीकरण केंद्रास वीजजोड
आंद्रा पाणी योजनेतून शहराला 100 एमएलडी अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे. इंद्रायणी नदीवरील निघोजे येथील अशुद्ध जलउपसा केंद्र व पंपिंग हाऊसला नुकताच तात्पुरता वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. आठवड्याभरात चिखली केंद्रास वीज मिळेल. येथील चाचणी यशस्वी झाल्यानंतर शहराला 100 एमएलडी पाणी दिले जाईल. त्यासाठी किमान 15 दिवसांचा कालावधी लागू शकतो, असे पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी सांगितले.

दररोज पाणीपुरवठ्याचे नियोजन
चाचणी यशस्वी झाल्यानंतर महिन्याअखेरीस चिखली केंद्रातून शहराला दररोज 100 एमएलडी पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे शहराची पाण्याची गरज भागणार आहे. पाणीपुरवठा व्यवस्थापन लक्षात घेऊन त्यानंतर संपूर्ण शहराला दररोज पाणीपुरवठा करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT