पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील पिंपरीतील दोन व चिंचवड स्टेशन येथील एक असा एकूण तीन ठिकाणी बहुमजली पार्किंगची व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. ही व्यवस्था डिजाइन, बिल्ट, फायनान्स, ऑपरेट अॅण्ड ट्रान्सफर (डीबीएफओटी) तत्वावर म्हणजेच सार्वजनिक व खासगी भागीदारीद्वारे (पीपीपी) उभारली जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात राहण्यास पसंती दिली जात असल्याने दिवसेंदिवस शहराची लोकसंख्या वाढत आहे. त्याबरोबरच खासगी वाहनांची संख्याही वाढत आहे. पालिकेने 1 जुलै 2021 पासून शहरातील काही प्रमुख रस्त्यांवर पे अॅण्ड पार्क योजना सुरू केली आहे. सध्या ती सात ते आठ ठिकाणी सुरू आहे. त्याचा पुढील भाग म्हणून शहरातील गर्दीच्या ठिकाणी प्रायोगिक तत्वावर वाहनतळ उभारण्यात येणार आहे.
पार्किगची सुविधा तयार करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी बीआरटीएस स्थापत्य विभागाच्या अधिकार्यांच्या समवेत प्रत्यक्ष जागांची पाहणी केली. पिंपरी उड्डाणपुलाखाली जुनी भाजी मंडई येथील 5 हजार 600 चौरस मीटर जागा आणि पिंपरी उड्डाणपुलाजवळील क्रोमा शोरूमशेजारील 2 हजार 487.15 चौरस मीटर जागा आहे.
तसेच, चिंवचड रेल्वे स्टेशनजवळील 3 हजार 910.53 चौरस मीटर जागा आहे. त्या जागा पालिकेच्या ताब्यात असून, त्या तीन ठिकाणी रॅम्प पद्धतीने बहुमजली पार्किंग सुविधा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गर्दीच्या ठिकाणी वाहनचालकांना पार्किंग मिळणार
पार्किगची ही सुविधा पीपीपी तत्वावर करण्याचा निर्णय बीआरटीएस विभागाने घेतला आहे. या सुविधेमुळे वाहनचालकांना हक्काची पार्किंग उपलब्ध होणार आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी वाहतुक समस्या सुटण्यास मदत होणार आहे. तसेच, तेथील पे अॅण्ड पार्कमुळे पालिकेच्या उत्पन्नात भर पडणार आहे. या बीआरटीस विभागाच्या प्रस्तावाला आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी मंजुरी दिली आहे. या सुविधेसाठी तज्ज्ञ सल्लागारांमार्फत जागेचा पार्किंग आराखडा तयार करण्यासाठी ई-निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.