पुणे

पिंपरी : वैविध्यपूर्ण आकर्षक फुलांच्या माळा, लटकन गणपती सजावट साहित्यांनी सजली बाजारपेठ

अमृता चौगुले

वर्षा कांबळे : 

पिंपरी : गणेशोत्सवास काही दिवस शिल्लक असल्याने बाजारपेठेत नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. नागरिक शनिवार आणि रविवारची सुटी साधत आतापासून गणपती सजावटीसाठी साहित्य खरेदी करत आहेत. बाजारपेठा देखील सजावट साहित्यांनी फुलून गेल्या आहेत. यामध्ये वैविध्यपूर्ण आकर्षक फुलांच्या माळा व लटकन, झिरमिळ्या, लॉन, फुले आणि कमानी, कुंदन टिकल्यांचा वापर केलेले झुंबर असे विविध प्रकारचे साहित्य उपलब्ध आहे. दोन वर्षे कोरोनामुळे बाजारपेठात सजावट साहित्यात नाविन्य नव्हते. पण यंदा राज्याबाहेरून साहित्य बाजारपेठेत विक्रीस उपलब्ध आहेत. यंदा सजावट साहित्यात 15 ते 20 टक्क्यांची वाढ झाल्याचे विक्रेते सांगत आहेत.

वैविध्यपूर्ण व आकर्षक फुलांच्या माळा
यावर्षी गणेशोत्सवासाठी आकर्षक अशा फुलांच्या माळा आल्या आहेत. दुकानाबाहेर लटकविलेल्या या रंगबेरंगी फुलांच्या माळा या नागरिकांना आकर्षित करत आहेत. यामध्ये मणी आणि रंगीत धाग्यांनी बनविलेल्या माळांचा देखील समावेश आहे. तर काही कापडाचे विविध आकार कापून रंगीत धाग्यांमध्ये बनविलेल्या माळा देखील आहेत. यांची किंमत 150 ते 500 रुपयांपर्यंत आहे.

विविध रंगांतील झिरमिळ्या व लॉन
सजावट साहित्यात मागे किंवा जमिनीवर लावण्यात येणारे आणि गवतासारखे दिसणारे प्लास्टिकचे लॉन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच सजावट अधिक आकर्षक आणि भरीव दिसावी यासाठी विविध रंगातील झिरमिळ्या उपलब्ध आहेत.यामध्ये झिरमिळ्या 100 रूपयांपासून तर लॉन्स 350 रुपयांपासून पुढे आहे.

क्रिस्टल, लाकडी, रेशीम, सुती धाग्यातील लटकन
बाजारात सजावटीसाठी लटकनचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. सोनेरी आणि चंदेरी रंगातील क्रिस्ट बेलचे लटकन विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. तसेच रंगीत रेशीम, सुती व क्रिस्टल बेलचे लटकन उपलब्ध आहेत. तर लाकडापासून बनविण्यात आलेले नवीन प्रकारचे लटकन विक्रीस उपलब्ध आहेत. यांची किंमत 100 ते 300 रुपयांपर्यंत आहे.

विविध रंगातील फुले आणि कमानी
बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात विविध रंगातील प्लास्टिकची फुले विक्रीस उपलब्ध झाली आहेत. विक्रेत्यांकडून ग्राहकांच्या आवडीनुसार मखरासाठी लागणारी फुलांची कमान बनवून दिली जात आहे. तसेच विविध रंगातील व आकारातील फुलदाणी विक्रीस ठेण्यात आल्या आहेत.

कुंदन टिकल्यांचा वापर केलेले झुंबर

यंदा गणोशोत्सवामध्ये कुंदन, टिकल्या, मणी, गोंडे यांचा सुरेख वापर केलेल्या लहान मोठी झुंबर दुकानात लटकविलेली दिसत आहेत. हे यंदाच्या गणेशोत्सवासाच्या सजावटीचे नाविन्य आहे.

SCROLL FOR NEXT