पुणे

पिंपरी : विवाहितेवर जादूटोणा करणार्‍यांवर गुन्हा

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  विवाहितेचा गर्भपात करण्यासाठी सासरच्यांनी घरात मंतरलेले लिंबू, तत्सम वस्तू ठेवल्या; तसेच हुंड्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. हा प्रकार तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आला. याप्रकरणी पीडित विवाहितेने तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुरुवारी (दि. 18) फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आमच्या मनासारखे लग्न झाले नाही, आमचा मानपान झाला नाही. अपेक्षेप्रमाणे दागिने दिले नाहीत. लग्न आवडले नाही, असे म्हणत विवाहितेचा छळ केला.

दरम्यान, विवाहिता गर्भवती असताना डोकेदुखीची गोळी म्हणून तिला गर्भपाताची गोळी दिली; तसेच गर्भपात करण्यासाठी जादूटोणा करून जेवणात अंगारा टाकला. बेडरूममध्ये ठिकठिकाणी मंतरलेले लिंबू व तत्सम वस्तू ठेऊन फिर्यादीच्या मनात भीती निर्माण केली. फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घेत खासगी व्यक्तीकडून मोबाईलचे सीडीआर काढून त्यातील नंबरवर सासरच्या लोकांनी फोन केले. दरम्यान, विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन दीराने तिचा विनयभंग केला. फिर्यादीला नांदवण्यासाठी माहेरच्यांकडून चार तोळे सोने हुंड्याची मागणी केली. हुंडा न दिल्याने आरोपींनी विवाहितेचा शिवीगाळ करून मारहाण केली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तळेगाव दाभाडे पोलिस तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT