पुणे

पिंपरी : वर्षभरात केवळ 63 अनधिकृत होर्डिंग काढणार्‍या तीन ठेकेदारांना मुदतवाढ

अमृता चौगुले

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा: शहरातील अनधिकृत जाहिरात होर्डिंग काढण्यासाठी महापालिका प्रशासनाने तीन ठेकेदारांची नियुक्ती केली होती. त्या माध्यमातून शहरातील केवळ 118 होर्डिंग काढण्यात आले. त्यापैकी 63 होर्डिंग 365 दिवसांत ठेकेदारांनी तर उर्वरित स्वत: संबंधितांनी काढले. अशी स्थिती असताना पुन्हा त्या तीन ठेकेदारांना तीन महिन्यांसाठी मुदतवाढ देत आकाशचिन्ह व परवाना विभागाने त्यांना बक्षिसी दिली आहे.

इंदूर पॅटर्नच्या धर्तीवर शहर होर्डिंगमुक्त करण्याचे नवे धोरण आकाशचिन्ह व परवाना विभागाने तयार केले आहे. त्या अंतर्गत शहरात केवळ पालिकेचे होर्डिंग असतील. त्यांचा आकार सर्वत्र एकसमान असणार आहे. त्यापूर्वी शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग काढण्यासाठी प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबवून आठ ठेकेदारांची नियुक्ती केली. त्यातील तीनच ठेकेदारांनी काम केले. परवाना निरीक्षकांच्या मदतीने ठेकेदार आपले मनुष्यबळ व यंत्रसामग्री लावून अनधिकृत होर्डिंगचे लोखंडी सांगाडा काढतात.

लोखंडांच्या भंगारातून 80 टक्के रक्कम महापालिकेकडे जमा करून उर्वरित 20 टक्के रक्कम ठेकेदारास घेतो. या कामाची मुदत 31 जुलैला संपली. गेल्या एक वर्षामध्ये या तीन ठेकेदारांनी केवळ 63 अनधिकृत होर्डिंगवर कारवाई केली. त्यामधून पालिकेला 8 लाखांचे उत्पन्न मिळाले. या कामासाठी अरबाज इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड सिव्हिल कन्स्ट्रक्शन, श्री गणेश एंटरप्रायजेस आणि योहान इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड कॉन्ट्रॅॅक्टर यांना पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यास आयुक्त राजेश पाटील यांनी मान्यता दिली आहे.

SCROLL FOR NEXT