पुणे

पिंपरी : रोज पाणीपुरवठ्याबाबत अनिश्चितता कायम

अमृता चौगुले

नंदकुमार सातुर्डेकर : 
पिंपरी : पावसामुळे पवना धरणात पुरेसा (67.80 टक्के) पाणीसाठा झाला आहे. दुसरीकडे भामा आसखेडमधून पाणीपुरवठा योजना मार्गी लागण्याच्या बेतात आहे. तरीही दररोज पाणीपुरवठा करण्याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. निघोजे बंधारा अर्थात भामा आसखेडमधून मिळणारे शंभर एमएलडी पाणी नव्याने समाविष्ट गावांना दिल्यानंतर शहरातील सोसायट्या व अन्य भागांना पाण्याचे नियोजन करून अंदाज घेतल्यानंतरच दररोज पाणीपुरवठा केला जाणे शक्य आहे की नाही, ते सांगता येईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. महापालिका पवना धरणातून दररोज पाचशे ते पाचशे दहा एमएलडी पाणी उचलते व शहरवासीयांना पाणीपुरवठा करते.

सर्वांना समान पाणी मिळावे यासाठी महापालिकेच्या वतीने दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. दररोज पाणीपुरवठा केल्यास चढावरच्या भागांमध्ये पाणी पुरेशा दाबाने मिळत नाही. लोकांच्या तक्रारी येतात म्हणून महापालिकेने हे धोरण स्वीकारले आहे. मात्र, दरम्यानच्या काळात शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठा करण्याबाबत घोषणा झाल्या.

अद्याप त्या प्रत्यक्षात आल्या नाहीत. भामा आसखेड योजनेचे रेंगाळलेले काम हे यामागील महत्त्वाचे कारण आहे. निघोजे बंधार्‍याकडून (एमआयडीसी) जागा मिळण्यास विलंब झाला. इलेक्ट्रिक सप्लाय,लाईन शिफ्ट करणे यासाठी 50 ते 60 मीटरचे काम बाकी आहे. हे काम करत असताना त्या ठिकाणी काळा दगड लागल्याने दगड फोडण्यास वेळ लागत आहे. पावसामुळे हे काम रेंगाळले आहे. मात्र, हे काम लवकरच पूर्ण होईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे.

हे काम पूर्ण होत आल्याने तसेच पवना धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने आता तरी दररोज पाणीपुरवठा होईल, या आशेवर नागरिक आहेत. भामा आसखेडमधून 100 एमएलडी पाणी चिखली, मोशी, दिघी आणि जाधववाडी भागाला देण्यात येणार आहे. त्या भागातील नागरिकांची पाण्याची सोय झाल्यानंतर वाचणारे पाणी शहरातील अन्य भागाला मिळेल, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात येत होते. त्यामुळे शहरवासीयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मात्र भामा आसखेडमधून शंभर एमएलडी पाणी नवीन समाविष्ट गावांना मिळाले तरी उरलेले पाणी वाटप करताना काही दिवस प्रयोग करण्यात व अंदाज घेण्यात जाणार आहेत. त्यामुळे दररोज पाणीपुरवठ्याबाबत आज तरी प्रशासन ठोस सांगायला तयार नाही.

निघोजे बंधार्‍याकडून (एमआयडीसी) जागा मिळायला उशीर झाला. त्यातून मार्ग काढत आता 50 ते 60 मीटरचे काम राहिले आहे. काळा दगड लागल्याने इलेक्ट्रिक सप्लाय आणि लाईन शिफ्ट करणे थोडे अवघड झाले. त्यात पाऊस आल्याने कामाचा वेग मंदावला. मात्र, लवकरच काम मार्गी लागेल. नवीन समाविष्ट गावांना शंभर एमएलडी पाणी दिल्यानंतर शहराच्या एकूण पाणीपुरवठ्याबाबत अंदाज घ्यावा लागेल.

नवीन सोसायट्यांना सध्या 40 लिटर दररोज तर 10 वर्षांपेक्षा जुन्या सोसायट्यांना दररोज 90 लिटर पाणी दिले जाते. त्यांना पुरेसे पाणी द्यावे लागेल. दुसरी गोष्ट पवना धरण 67.80 टक्के भरले असले तरी महापालिकेला दररोज पाचशे ते पाचशे दहा एमएलडी पाणी उचलता येते. वर्षभर पुरेल एवढेच रिझर्वेशन आहे. जादा पाणी उचलण्यास परवानगी नाही, हे लक्षात घ्यावे लागेल. एकूणच भामा आसखेड पाणी योजनेतून पाणीपुरवठा सुरू झाल्यावर इतर भागात कसे पाणी देता येते, याचा अंदाज घेऊन मगच दररोज पाणीपुरवठा शक्य आहे.
-श्रीकांत सवणे,
सह शहर अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका

पवना धरण पाणीसाठा
1 जूनपासून झालेला पाऊस
1,427 मि.मि.
गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत झालेला एकूण पाऊस
738 मि.मि.
धरणातील सध्याचा पाणीसाठा 67.80 टक्के
गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा
37.85 टक्के
1 जूनपासून पाणीसाठ्यात
झालेली वाढ
50.96 टक्के

SCROLL FOR NEXT