पिंपरी: पुढारी वृत्तसेवा: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या तयार करीत असताना राजकीय हस्तक्षेप झाला आहे. निवडणूक विभागाच्या अधिकार्यांनी पक्षपातीपणाचा केला आहे. त्यामुळे मतदारांना हरकती व सूचना दाखल करण्यासाठी किमान 30 दिवसांची मुदतवाढ द्यावी. तसेच, मतदार याद्यांमध्ये सुधारणा करावी. अन्यथा विधिमंडळ अधिवेशनात हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार आहे, असा इशारा विधान परिषदेच्या नवनिर्वाचित आमदार उमा खापरे यांनी दिला आहे.
आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ आणि निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत त्यांनी पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, महानगरपालिका निवडणूक- 2022 साठी निवडणूक विभागाने प्रारुप मतदार याद्या जाहीर केल्या. 17 जून रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होणार होत्या. परंतु, सुधारित कार्यक्रमानुसार प्रारूप मतदार याद्या 23 जून रोजी प्रसिद्ध झाल्या.
त्यावर 1 जुलैपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, असे प्रशासनाचे सूचित केले आहे. तसेच, प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 9 जुल रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. याचा अर्थ निवडणूक विभाग हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी केवळ 8 दिवसांचा वेळ देत आहे. मतदार याद्या फोडताना प्रशासनाने प्रभागाच्या सीमांचा विचार केलेला दिसत नाही. त्यामुळे सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांचे प्रभागातील मतदार याद्यांबाबत हरकती असल्याचे दिसत आहे.