पुणे

पिंपरी : यांत्रिक पद्धतीने रस्तेसफाईची निविदा अखेर प्रसिद्ध

अमृता चौगुले

पिंपरी : शहरातील 18 मीटरपेक्षा अधिक रुंदीचे मोठे रस्ते यांत्रिक पद्धतीने (रोड स्वीपर मशिन) साफसफाई कामाची निविदा अखेर मंगळवारी (दि. 19) प्रसिद्ध करण्यात आली. सात वर्षे कालावधीसाठी तब्बल 362 कोटी 4 लाख खर्चाचे हे काम आहे. अनेक महिन्यांपासून रखडलेला व वादग्रस्त ठरलेला हा विषय प्रशासकीय राजवटीत अखेर मार्गी लागला आहे.

तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यापासून यांत्रिक पद्धतीने रस्ते सफाईचा निविदा रखडली आहे. तसेच, सर्वसाधारण सभेत अनेकदा तो प्रस्ताव तहकूब करून दप्तरी दाखल करण्यात आला होता. या प्रस्तावात अनेक बदलही करण्यात आले. शहरातील आठ क्षेत्रीय कार्यालयनिहाय आठ भागांत, नंतर चार भाग करून व शेवटी दोन भाग करण्यात आहे.

महापौर उषा ढोरे यांच्या शेवटच्या सर्वसाधारण सभेतही हा प्रस्ताव तहकूब करण्यात आला. मात्र, प्रशासकीय राजवटीत आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी या तहकूब विषयाला 29 मार्च 2022 ला तातडीने मंजुरी दिली. शहरातील 18 मीटरपेक्षा अधिक रूंदीचे रस्ते यांत्रिक पद्धतीने साफ केले जाणार आहेत. शहराचे दक्षिण व उत्तर असे दोन भाग करून हे काम केले जाणार आहे. त्याकरीता सल्लागार टंडन अर्बन सोल्युशन या एजन्सीने सुधारित प्रस्तावाचा मसुदा (आरएफपी) तयार केला.

आयुक्तांच्या मंजुरीनंतर साडेतीन महिन्यांनतर अखेर, आज त्या कामाची निविदा आरोग्य विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. निविदेत दक्षिण व उत्तर भागाचे प्रत्येकी दोन विभाग करण्यात आले आहेत. त्यासाठी 17 ऑगस्टपर्यंत निविदा स्वीकारली जाणार आहे.

असे आहे काम
दक्षिण भागासाठी 331 किलोमीटर अंतराचे आणि उत्तर भागासाठी 339.15 किलोमीटर अंतराचे मोठे रस्ते आहेत. त्यामध्ये शहरातील महामार्ग, बीआरटीएस मार्ग व 18 मीटरपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते तसेच मंडई व इतर मोकळ्या जागाचा समावेश आहे. प्रत्येक भागासाठी विविध प्रकारचे प्रत्येकी 16 वाहने आणि प्रत्येकी 191 चालक, ऑपरेटर, सफाई कामगार व मजूर नेमले जाणार आहेत. या सात वर्षांच्या कामासाठी एकूण 362 कोटी 4 लाख खर्च अपेक्षित आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT