पिंपरी : पोलिस आमचे काहीएक करू शकत नाही, असे म्हणून सात जणांनी मिळून महिलेच्या घरातील साहित्याची तोडफोड केली. तसेच, महिलेशी गैरवर्तन करीत तिचा विनयभंग केला. ही घटना मुळशी तालुक्यातील माण येथे मंगळवारी (दि. 16) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी पीडित महिलेने याप्रकरणी बुधवारी (दि. 17) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला आणि आरोपी नातेवाईक आहेत. यापूर्वी दोघांनी एकमेकांविरोधात हिंजवडी पोलिस ठाण्यात अर्ज दिले आहेत. दरम्यान, फिर्यादी महिला मंगळवारी सायंकाळी घरी असताना आरोपी घरात घुसले. त्यांनी फिर्यादीच्या पतीला ढकलून मारहाण केली.त्यावेळी फिर्यादी पतीला सोडविण्यासाठी गेल्या असता आरोपींनी शिवीगाळ करीत त्यांचा विनयभंग केला. त्यानंतर महिलेच्या सुनेला मारून तिलाही शिवीगाळ केली.