पुणे

पिंपरी :  महापालिकेत ‘प्रशासक राज’ जोरात, ‘स्थापत्य’ची 30 टक्के तरतूद खर्च

अमृता चौगुले

पिंपरी :  पुढारी वृत्तसेवा : महापालिकेत सध्या आयुक्त राजेश पाटील यांचे 'प्रशासक राज' जोरात सुरू आहे. गेल्या तीन महिन्यांत स्थापत्य विभागाकडून विकासकामांच्या 354 कोटी 36 लाख रुपयांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तर, 365 कोटी रुपये इतकी रक्कम खर्च करण्यात आली आहे. पहिल्या तीन महिन्यांतच एकूण तरतुदीपैकी 30 टक्के रक्कम खर्च करण्यात प्रशासनाला यश आले आहे.

शहरात होणार्‍या विकासकामांमध्ये प्रामुख्याने सिमेंटचे रस्ते, उड्डाणपूल, खडी मुरुमाचे रस्ते, जलवाहिन्यांची कामे, पावसाळी गटार, सांडपाणी नलिकांची कामे, पदपथ, उद्यानांचा विकास, अशा विविध कामांचा समावेश होतो. त्यातही सर्वाधिक कामे महापलिका स्थापत्य विभागाच्या माध्यमातून होतात.

स्थापत्य विभागाकडून 2022-23 या आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत झालेल्या कामांची माहिती घेतली असता केवळ 3 महिन्यांमध्ये आर्थिक वर्षासाठी केलेल्या तरतुदीच्या तुलनेत 30 टक्के रक्कम खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. स्थापत्य विभागाकडून 1 हजार 216 कोटी 53 लाख रुपयांची तरतूद चालू आर्थिक वर्षासाठी करण्यात आलेली आहे. त्यापैकी 1 एप्रिल ते 3 जुलै या कालावधीत 365 कोटी रुपये इतकी रक्कम खर्च करण्यात आलेली आहे. तर, सध्या 851 कोटी 53 लाख रुपये इतकी तरतूद खर्च करणे बाकी आहे.

नवीन कार्यादेशासाठी प्रतीक्षा
महापालिका स्थापत्य विभागाकडून चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत विकासकामांसाठी 25 निविदा काढण्यात आल्या आहेत. 354 कोटी 36 लाख रुपये इतक्या रकमेची ही विकासकामे आहेत. तर, पहिल्या तिमाहीत झालेला खर्च हा गेल्या आर्थिक वर्षात मंजुरी मिळालेल्या विकासकामांवरच झालेला आहे.

विकासकामांना गती
महापालिका निवडणुका येत्या काही महिन्यांमध्ये लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रभागांतील विकासकामे मार्गी लागावीत, यासाठी माजी नगरसेवकांकडून पाठपुरावा सुरू आहे. महापालिकेतील 'प्रशासक राज'मध्ये आयुक्तांनाच निर्णय घेण्याचे अधिकार असल्याने कामांचे नियोजन करुन त्याबाबत तातडीने कार्यवाही होत आहे. पर्यायाने, विकासकामांना गती आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT