पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या 128 शाळा सध्या 84 शाळा इमारतींमध्ये भरत आहेत. शाळांची संख्या जास्त मात्र त्या तुलनेत इमारती कमी पडत असल्याने सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांमध्ये या शाळा घ्याव्या लागत आहे. महापालिका प्रशासनाकडून शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न होत असताना शाळांतील भौतिक सुविधांकडे मात्र अपेक्षित लक्ष दिले जात नसल्याचे चित्र सध्या समोर आले आहे.
या शाळांमध्ये प्रामुख्याने गरीब वर्गातील मुले शिकतात. या शाळांसाठी आवश्यक इमारतींची संख्या कमी असल्याने सकाळी 7.15 ते 12.15 आणि दुपारी 12.30 ते 5.30 अशा दोन सत्रांमध्ये सध्या शाळा भरवाव्या लागत आहे. काही ठिकाणी तर उपलब्ध खोल्याही अपुर्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अक्षरशः शाळेतील संगणक विभाग, शास्त्र प्रयोगशाळेत बसवावे लागत आहे.
पावसाळ्यात छतामध्ये पाणीगळती होणार्या शाळा महापालिका प्रशासनाने शोधून त्यांची डागडुजी करण्याचे काम हाती घेतले आहे.
शाळांसाठी जागेचा शोध सुरू शहरातील विविध प्रभागांमध्ये शाळांसाठी असलेल्या आरक्षणाची सध्या ऑनलाइन पडताळणी होत आहे. तसेच, जुन्या शाळांपासून हे आरक्षण किती अंतरावर आहे, याचीही माहिती घेतली जात आहे. प्रत्येक शाळेत गणित, इंग्रजीसाठी 3 तज्ज्ञ शिक्षकांची नियुक्ती केली आहे. शाळांमध्ये संगणक, गणित विभाग आणि शास्त्र प्रयोगशाळा तयार केल्या आहेत.
शाळेसाठी 20 वर्ग खोल्यांची आवश्यकता आहे. मात्र, 12 वर्ग खोल्याच उपलब्ध आहेत. त्यामुळे दोन सत्रात शाळा भरते. सध्या असलेली स्वच्छतागृहे अपुरे पडतात. त्यामुळे आणखी स्वच्छतागृहांची मागणी केली आहे. एका वर्गखोलीचा दरवाजा तुटलेला आहे, त्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे.
– अंजली झगडे, मुख्याध्यापिका, विद्यानिकेतन पिंपरी वाघेरे मुले/मुली शाळा.महापालिका शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. तसेच, भौतिक सुविधांमध्ये सुधारणा करण्यात येत आहे. सर्व शाळांचे रंगकाम केले जात आहे. छतामधून पाणी गळती होणार्या शाळांमध्ये दुरुस्ती केली जात आहे. त्याशिवाय, ड्रेनेज आणि पाणीपुरवठा या सुविधांबाबतही प्रभागस्तरावर कार्यवाही सुरू आहे.
– संजय नाईकडे, प्रशासन अधिकारी,
शिक्षण विभाग, महापालिका.