पिंपरी : शहरातील काही नागरिकांनी घर बदलले आहे. पत्ता बदल्याने त्या प्रभागातील मतदार यादीत नाव समाविष्ट करावे, अशी मागणी अनेक नागरिक करीत आहेत. मात्र, महापालिकेस त्याप्रमाणे नाव समाविष्ट करण्याचा किंवा वगळण्याचा अधिकार नाही. ज्या प्रभागात पूर्वी नाव होते, तेथेच मतदाराचे नाव कायम राहणार आहे, असे महापालिकेच्या निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी सोमवारी (दि.11) स्पष्ट केले. महापालिकेची प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी तयार करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाची पिंपरी, चिंचवड, भोसरी व भोर विधानसभा मतदारसंघाची मतदाराची यादी वापरण्यात आली आहे.
प्रभागनिहाय यादी तयार करताना, हरकतीची पडताळणी करताना यादीतून नाव वगळणे किंवा नाव समाविष्ट करण्याचा अधिकार महापालिकेस नाही, असे सक्त सूचना राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेस 24 जून 2022 ला दिल्या आहेत. तसेच, पत्तामध्ये बदल झाला असल्यास त्या प्रभागातील यादी नाव समाविष्ट करण्याचा अधिकारही पालिकेस नाही. यादीतील शीर्षक पत्तानुसार सर्व मतदारांची नावे दुसर्या प्रभागात जात असतील तर, नकाशानुसार ती इमारत ज्या प्रभागात समाविष्ट होते, त्या प्रभागात त्या मतदारांची नावे ठेवण्यात येणार आहेत.