पुणे

पिंपरी : पोस्टमनवरील कामाच्या ताणामुळे टपाल वाटपावर परिणाम

अमृता चौगुले

नंदकुमार सातुर्डेकर : 

पिंपरी : पोस्टमनवरील कामाच्या अतिरिक्त ताणामुळे टपाल वितरणावर परिणाम होत आहे. शहरातील विविध ठिकाणच्या टपाल कार्यालयांमध्ये टपालाचे ढीगच्या ढीग साठले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात 33 पोस्ट ऑफिस आहेत. त्यातील पंधरा डिलिव्हरी ऑफिस आहेत. मात्र, पोस्टमनवर कामाचा अतिरिक्त ताण वाढला आहे. टपाल वितरणासह पोस्टमनला 399 रुपयांत दहा लाखांचा विमा ही टाटाची पॉलिसी, मातृवंदना योजनेचे खाते काढणे, आधार मोबाईल लिंकिंग, बाल आधार कार्ड नवीन काढणे, ही कामे करावी लागत आहेत. त्यामुळे टपाल वितरणावर परिणाम झाला आहे.

एकीकडे पोस्टमनचा कामाचा ताण वाढला आहे, तर लोकांचीही गैरसोय होत आहे. पोस्टमनकडे सोपवण्यात आलेल्या जबाबदार्‍या पाहता तुलनात्मकदृष्ट्या त्याची पोस्ट कार्यालयात उपलब्धता कमी आहे. विविध कामांसाठी लोक पोस्टमनकडे पोस्ट ऑफिसमध्ये येतात. मात्र, पोस्टमन सकाळी 9 ते 11 उपलब्ध असतात त्यानंतर जेव्हा नागरिक आधार, मातृवंदना आदी कामे घेऊन येतात.त्या वेळी पोस्टमन पोस्टात उपलब्ध नसतात ते टपाल वितरणास निघालेले असतात. पोस्टमनच्या जागा भरल्या जात नसल्याने व मनुष्यबळ कमी असल्याने तीन पोस्टमनचे काम एकच पोस्टमन करत आहेत. रिक्त जागा भरल्या जात नाहीत. सकाळी आठ वाजता ऑफिसमध्ये येणारा पोस्टमन सायंकाळी सात ते आठ वाजता घरी जातो.

पोस्टमनकडे विविध जबाबदार्‍या सोपविण्यात आल्या आहेत. मात्र, वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याने तसेच लाईट गेल्यानंतर जनरेटर नसल्याने, अनेक ठिकाणी असलेले जनरेटर चालू नसल्याने पोस्टमन व नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका निवडणूक तोंडावर आल्याने राजकीय मंडळी पोस्टाचे विविध कॅम्प लावत आहेत. मात्र, सरकारने पोस्ट ऑफिसमध्ये पॉलिसी, आधार व इतर अधिक सुविधा उपलब्ध करून दिल्या असताना राजकारण्यांच्या दारात जाऊन या सुविधा का मिळवायच्या, असा नागरिकांचाही प्रश्न आहे. यासंदर्भात पिंपरी चिंचवडचे सब डिव्हिजन इन्स्पेक्टर सी. एम. नदाफ यांच्याशी संपर्क साधला असता मला याबाबत बोलण्याचे अधिकार नसल्याचे सांगत त्यांनी विषयात बोलणे टाळले.

शहरात पोस्टाची 33 कार्यालये आहेत. यातील पंधरा डिलिव्हरी ऑफिस आहेत. अडीचशे पोस्टमन कार्यरत आहेत. पोस्टमनवरील जबाबदार्‍या वाढल्या असल्या, तरी त्यामुळे टपाल वितरणावर परिणाम झाला असावा, असे वाटत नाही.
                                       – के. एस. पारखी, जनसंपर्क निरीक्षक, पोस्ट खाते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT