पिंपरी : चिंचवड, लिंक रोड येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प इमारतीतील सदनिकेचे वाटप होण्यापूर्वीच काही नागरिकांनी सदनिकांना ताब्यात घेत घुसखोरी केली. मात्र, महापालिका प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात तातडीने कारवाईत करीत घुसलेल्यांना बाहेर काढले.
सुरक्षेसाठी त्या ठिकाणी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.
महापालिकेच्या लिंक रोड येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात इमारती उभारल्या आहेत. एका इमारतीमध्ये 112 सदनिका असून, दोन इमारतीतील 224 सदनिकांचे वितरण होणे बाकी आहे. पात्र लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रे जमा करून स्वहिस्सा रक्कम जमा करून घेतली जात आहे. अशा लाभार्थ्यांना सदनिकेचा ताबा दिला जाणार आहे. काही तांत्रिक कारणांमुळे सोडतीचा कार्यक्रम स्थगित झाला.
त्यावरून काही संघटनांच्या वतीने चिंचवडच्या झोपडपट्टी निर्मुलन पुनर्वसन विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. प्रकल्पाच्या इमारतीच्या ठिकाणी बुधवारी (दि. 13) नागरिकांसह लाभार्थ्यांनी भरपावसात गर्दी केली. यादीनुसार एका ठिकाणीच सर्वांना सदनिका द्या, अशी त्यांनी आग्रही मागणी करीत घोषणाबाजी केली. प्रवेशद्वाराचे टाळे तोडून इमारतीमध्ये प्रवेश केला. सदनिकेचे कुलूप तोडून तेथे घुसखोरी केली. काहींनी स्वत:चे कुलूप लावून हक्क सांगितला.
घुसखोरीचा हा प्रकार समजताच पालिका प्रशासन सतर्क झाले. अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप व अधिकार्यांनी नागरिकांची भेट घेऊन त्यांना समजून सांगितले. कागदपत्रांची पुर्तता करा. स्वहिस्सा भरा. त्यांना सदनिका वितरीत केल्या जातील, अशी ग्वाही दिली. पोलिस बंदोबस्त मागवून घेऊन नागरिकांनी लावलेले टाळे काढून घेतले. सर्व परिसर रिकामा करून घेऊन तेथे सुरक्षारक्षक तैनात करण्यात
आले आहेत.
नियमानुसारच सदनिकांचे वितरण : अतिरिक्त आयुक्त
कागदपत्रांची पूर्तता करणारे तसेच, स्वहिस्सा भरणारा पात्र लाभार्थ्यांना लवकरच या दोन इमारतींमधील 224 सदनिकांचे वितरण केले जाणार आहे. त्यासंदर्भात कार्यवाही वेगात पूर्ण केली जात आहे. सोडत कार्यक्रमासाठी पात्र लाभार्थ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, असे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी सांगितले.