पुणे

पिंपरी : पार्किंगसाठी इमारत उभारण्यास ठेकेदारांची ‘ना’; निविदेस तिसर्‍यांदा मुदत देण्याची पालिका प्रशासनावर नामुष्की

अमृता चौगुले

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा: झपाट्याने वाढत असलेल्या आणि खासगी वाहनांची संख्या वाढत असल्याने पिंपरी-चिंचवड शहरात वाहतुक व पार्किंगची समस्या जटील होत चालली आहे. त्यावर उपाय म्हणून पालिकेने पिंपरीतील दोन आणि चिंचवड रेल्वे स्थानक येथील एक असे एकूण तीन ठिकाणी डीबीएफएटी (पीपीपी) तत्वावर वाहन पार्किंगसाठी इमारत उभारण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याला एकाही ठेकेदाराने प्रतिसाद न दिल्याने निविदेस तिसर्‍यांदा मुदतवाढ देण्याची नामुष्की महापालिका प्रशासनावर ओढविली आहे.

पुणे पालिकेच्या धर्तीवर स्वतंत्र इमारत                                                                                                                              वाहन पार्किंगवर तोडगा काढण्यासाठी पालिका पुणे महापालिकेच्या धर्तीवर पार्किंगसाठी स्वतंत्र इमारत उभी करीत आहे. त्यासाठी पालिका केवळ जागा उपलब्ध करून देणार आहे. आवश्यकतेनुसार इमारत बांधून वाहनचालकांकडून शुल्क वसुलीसाठी डिजाइन, बिल्ट, फायन्यास, ऑपरेट व ट्रान्सफर (डीबीएफएटी) या तत्वावर जुलै महिन्यात निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जागेनुसार डिझाईन
जागेनुसार ठेकेदाराने डिजाइन तयार करून त्या ठिकाणी स्वखर्चाने इमारत बांधणे, त्या ठिकाणी पार्किंगसाठी वाहनचालकांकडून शुल्क जमा करणे, तो कालावधी 30 वर्षाचा आहे. त्यानंतर पालिकेकडे हस्तांतरण करणे असे कामाचे स्वरूप आहे.

प्रतिसाद न मिळाल्यास 'ये रे माझ्या मागल्या…
पुन्हा या निविदेला पहिला व दुसर्‍या मुदतीमध्ये एकाही ठेकेदाराने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे 12 सप्टेंबर 2022 पर्यंत तिसरी मुदतवाढ देण्याची नामुष्की रस्ते नियोजन विभागावर ओढविली आहे. या मुदतवाढीत प्रतिसाद न मिळाल्यास प्रशासनाला अटी व शर्ती बदलून नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी लागणार आहे.

सुरक्षित पार्किंग उपलब्ध होणार
स्वतंत्र इमारतीमुळे वाहनचालकांना सुरक्षित पार्किंगचा पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे भाजी मंडई, बाजारपेठ व रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यांवरील वाहनांची गर्दी कमी होणार आहे. त्या दृष्टीने पालिकेने तीन ठिकाणासाठी निविदा राबविली आहे. पिंपरी मंडईतील पार्किंगमध्ये 500 दुचाकी व 200 कारसाठी जागा उपलब्ध होणार आहे. क्रोमा शोरूमजवळील जागेत 100 कार व 300 दुचाकी आणि चिंचवड स्टेशन येथील जागेत 125 कार व 400 दुचाकी पार्क केल्या जाऊ शकतील, असे रस्ते नियोजन विभागाचे कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनी सांगितले.

पे अ‍ॅण्ड पार्क योजना गुंडाळली
महापालिकेने मोठा गाजावाजा करीत शहरात पे अ‍ॅण्ड पार्क योजना सुरू केली होती. शहरातील प्रमुख रस्ते व उड्डाणपुलाखाली ही योजना सुरू केल्यानंतर काही महिन्यांतच ती बहुतांश ठिकाणी बंद पडली. त्यानंतर वाहतुक पोलिसांची मदत घेऊन पुन्हा नव्या दमाने योजना सुरू करण्यात आली. मात्र, वाहनचालकांकडून शुल्क देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ही योजना गुंडाळण्याची तयारी रस्ते नियोजन विभागाने केली आहे. तसा प्रस्ताव आयुक्तांसमोर ठेवला जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

महापालिकेची पे अ‍ॅण्ड पार्क योजना फसली
पार्किंग इमारतीसाठीच्या जागा
पिंपरी कॅम्पातील जुनी मंडईतील 5,600 चौरस मीटर जागा
पिंपरीतील इंदिरा गांधी उड्डाणपुलाजवळील क्रोमा शोरूमशेजारील 2 हजार 487.15 चौ.मी.जागा
चिंचवड रेल्वे स्थानक, ब क्षेत्रीय कार्यालयासमोरील 2 हजार 487.15 चौरस मीटर जागा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT