पिंपरी : पुढारी वृत्तसेवा
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने फळ विक्रेत्याला शिवीगाळ करीत त्याच्यावर चाकूने वार केले. ही घटना शुक्रवारी (दि. 17) दुपारी साडेपाचच्या सुमारास साने चौक, भाजी मंडईजवळ चिखली येथे घडली. अमोल जयराम गायकवाड (37, रा. घरकुल वसाहत, चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, अस्लम मुजावर (रा. मोरेवस्ती, चिखली) आणि त्याच्या तीन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे गाडीवर फळांची विक्री करतात. दरम्यान, शुक्रवारी दुपारी साडेपाचच्या सुमारास आरोपी तिथे आले. त्यांनी फिर्यादी यांच्या फळगाडीवरून आंबे उचलून दारू पिण्यासाठी पैसे मागितले. फिर्यादी यांनी पैसे देण्यास विरोध केला. त्यामुळे आरोपींनी त्यांची हातगाडी उलटवून टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच, आरोपी अस्लम मुजावर याने फिर्यादी यांच्या कानावर चाकूने वार केला. तसेच, त्याच्या तीन मित्रांनी फिर्यादी यांना पकडून लोखंडी मापाने छातीवर मारले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलिस तपास करीत आहेत.