पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पोलिसांवर वार करणार्या दरोडेखोरांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने ही कारवाई केली. आरोपींकडून पाच लाच 63 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करण्यात आला आहे. करणसिंग रजपुतसिंग दुधाणी (25, रा. रामटेकडी, हडपसर), अनिल बच्चन टाक (29, रा. सम्राटनगर, ओटा स्किम, निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोम्बिंग ऑपरेशन सुरू असताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक उत्तम तांगडे, उपनिरीक्षक मंगेश भांगे यांना माहिती मिळाली की, चिंचवड येथे काही जण एका चारचाकी वाहनातून संशयीतरित्या फिरत आहेत. त्यानुसार, पथकाने सापळा रचला. मात्र, पोलिस आल्याची चाहुल लागल्याने तीन आरोपी गाडी सोडून पळून गेले.
आरोपी करणसिंग दुधाणी आणि अनिल टाक यांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडे दोन लाख तीन हजार 500 रुपयांचे एक बोअर कटर, स्क्रू ड्रायव्हर, कोयता, लोखंडी कटावणी व एक चारचाकी वाहन मिळून आले. आरोपी चिंचवड येथील पेट्रोल पंपावर दरोडा टाकणार होते, असे पोलिस चौकशीत समोर आले आहे. त्यांच्या विरोधात चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
आरोपी करणसिंग दुधाणी व त्याचा फरार साथीदार जितसिंग राजपालसिंग टाक याच्यावर निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्या दोघांनी निगडी येथून एक चारचाकी गाडी चोरली होती. त्यावेळी पोलिस निरीक्षक अजय जोगदंड आणि पोलिसांवर वार केले. आरोपींवर आणि त्यांच्या इतर साथीदारांवर गुन्हे दाखल आहेत.