संतोष शिंदे : पिंपरी : पोलिस दलात खबर्यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. मात्र, अलीकडे गुन्ह्याची उकल किंवा आरोपी शोधण्यासाठी फोन टॅपिंग, कॉल्सचे तपशील, लोकेशन ट्रेसिंग, सीसीटीव्ही फुटेज यांसारख्या टेक्निकल अॅनालिसिसला पोलिस प्राधान्य देऊ लागले आहेत. परिणामी, पोलिस खात्याची भिस्त असलेल्या पारंपरिक खबर्यांचे नेटवर्क ढासळू लागले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये खबर्यांअभावी सहा खुनाचे मारेकरी आजही उजळ माथ्याने समाजात वावरत आहेत.
खबरी हे पोलिस खात्याचे कान आणि डोळे समजले जातात. त्यांनी दिलेल्या 'टीप'वर पोलिसांनी अनेक महत्त्वाचे गुन्हे उघड केले आहेत. मात्र, अलीकडे तंत्रज्ञानाचा वाढता वापर, खबर्यांचे वाढलेले भाव, (सिक्रेट फंड) निधी मिळवण्यासाठी येणार्या अडचणी, अशा विविध कारणांमुळे खबरी पोलिसांपासून दुरावत चालले आहेत. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर न केलेल्या गुन्हेगारांपर्यंत पोलिस पोहोचत नसल्याचे काही घटनांमधून दिसून येत आहे.
'खबरी'अभावी 'त्या' घटनांचे गूढ कायम
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात सहा खून प्रकरणात पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. काळेवाडी येथे उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून अज्ञातांनी घरात झोपलेल्या दोन महिलांच्या डोक्यात कठीण वस्तूने प्रहार त्यांचा निर्घृण खून केला. 16 ऑक्टोबर 2021 रोजी पहाटे काळेवाडी येथे हे दुहेरी हत्याकांड उघडकीस आले. या प्रकरणात पोलिसांनी सर्व प्रकारच्या तांत्रिक बाबी तपासल्या. मात्र, काहीच धागेदोरे मिळाले नाहीत. मयत महिलेचा मुलगा, सून यांच्यासह अन्य दोघांचे ब—ेन मॅपिंग, पॉलिग्राफ व नार्को टेस्ट देखील करण्यात आली. यातही विशेष माहिती समोर आली नाही.
घरफोड्या आणि चेन चोरी करणारे मोकाटच
मागील काही दिवसांत चेन चोर्या करणार्यांचे प्रमाण वाढले आहे. चोरटे महिलांच्या गळ्यातील लाखो रुपयांचा ऐवज घेऊन पसार झाले आहेत. मागील सात महिन्यात घडलेल्या 63 गुन्ह्यात पोलिसांना आरोपींचा मागमूस नाही. तसेच, घरफोडीचे 239 पैकी केवळ 53 गुन्हे उघड झाले आहेत. असे गुन्हे करणार्या सराईतांची माहिती तांत्रिक तपास करूनही मिळत नसल्यामुळे घरफोड्या व इतर गुन्हे सुरूच आहेत.
खबर्यांवर जीवघेणे हल्ले
पोलिसांना खबर दिल्याच्या संशयावरून कित्येकजणांवर जीवघेणे हल्ले झाल्याची पोलिस दप्तरी नोंद आहे. पोलिसांमधूनच कोणीतरी नाव फोडत असल्याने कोणीही पोलिसांना माहिती देण्याच्या झंजटमध्ये पडत नाहीत. त्यामुळे पोलिसांनी या बाबींचा देखील विचार करणे गरजेचे आहे.
खबर्यांचे वाढले भाव…
पोलिस अधिकार्यांशी चांगले संबंध प्रस्थापित व्हावे, यासाठी काही जण पोलिसांना खबर देतात. तसेच, बहुतांश जण पैशासाठी किंवा दुखावलेले असल्याने खबर देतात. यापूर्वीच्या चांगल्या खबरीसाठी पोलिसांना पाचशे ते हजार रुपये मोजावे लागत होते. मात्र, अलीकडे एखादी खबर देण्यासाठी 10 ते 50 हजारांपर्यंत अॅडव्हान्समध्ये पैसे द्यावे लागतात. पैसे देऊनही खबर खरीच निघेल याची शाश्वती नसते. यातच काही खबरे आपल्याकडे असलेल्या माहितीचे चांगलेच भांडवल करतात. एकच माहिती एकापेक्षा जास्त जणांना देऊन स्वतःचा भाव वाढवून घेतात. या सर्व बाबी लक्षात आल्याने पोलिस खबर्यांकडे दुर्लक्ष करू लागले आहेत.
पोलिसांसाठी असलेला सिक्रेट फंड मिळवण्यासाठीची प्रक्रिया सुलभ करणे आवश्यक आहे. तसेच, तो खबरीनुसार कमी जास्त प्रमाणात देण्यात यावा. पोलिस अधिकार्यांनी आपले खबर्यांचे जाळे वाढविण्यासाठी सतत प्रयत्नशील असले पाहिजे. खबर्यांची संख्या रोडावणे पोलिस दलासाठी ठीक नाही. तंत्रज्ञानाला खबर्यांच्या माहितीची जोड मिळाल्यास गुन्हे 'डिटेक्ट' होतील. खबर्याचे जाळे पुन्हा सशक्त करण्यासाठी उच्चपदस्थ अधिकार्यांनी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.
– सुरेश भोसले, सहायक पोलिस आयुक्त (निवृत्त)