पुणे

पिंपरी : झाडांवर फ्लेक्स लावल्याने दोघांवर गुन्हा दाखल

अमृता चौगुले

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या झाडांना लोखंडी पिना मारून इजा पोहोचवून फ्लेक्स लावल्याप्रकरणी दोघांविरोधात भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (11 रोजी) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास भोसरी येथील गंगोत्री पार्क दिघीरोड परिसरात घडली.

याप्रकरणी अ‍ॅड. राहुल बाळासाहेब गवळी (वय 38, रा. सँडविक कॉलनी, भोसरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विकास गणेश चामलेवाढ (वय 18, रा. चंदननगर, पुणे) आणि देविदास अशोक साबळे (वय 19, रा. लोहगाव, पुणे) यांच्याविरोधात महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975, कलम 8 (21) व महाराष्ट्र मालमतेच्याविद्रुपी करणास प्रतिबंध अधिनियम कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी हे शनिवारी गंगोत्री पार्क येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या झाडांवर मोठ्या स्टेपलरने एक बाय एक फुटाचे फ्लेक्स लावताना दिसले. त्यामुळे फिर्यादी गवळी यांनी जवळ जाऊन बघितले. आरोपी पुरंदर येथील श्री छत्रपती संभाजी राजे आतंरराष्ट्रीय विमानतळालगत मोरगाव येथे डांबरी रोड टच प्लॉट उपलब्ध असल्याचे फ्लेक्स लावत होते. स्टेपलरच्या सहाय्याने झाडांना लोखंडी पिना मारून फ्लेक्स लावताना आरोपी दिसले. या प्रकाराने झाडांना इजा पोहोचवत होते. महापालिकेच्या परवानगीशिवाय फ्लेक्स लावल्यामुळे शहराचे विद्रुपीकरणही झाले, असे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलिस अधिक तपास करत आहेत.

SCROLL FOR NEXT