दीपेश सुराणा : पिंपरी : पिंपरी येथील नवीन इमारतीत स्थलांतर झालेल्या जिजामाता रुग्णालयात पालिकेने विविध वैद्यकीय सुविधा दिल्या आहेत. मात्र, अपघात झाल्यानंतर उपचारासाठी आलेल्या रुग्णांवर येथे केवळ प्राथमिक उपचार होऊ शकतात. पुढील उपचारांसाठी रुग्णांना वायसीएममध्ये जावे लागत आहे.
त्याशिवाय, रुग्णालयात हाडांवरील शस्त्रक्रिया (अस्थिरोग शस्त्रक्रिया) करण्याची सुविधा तूर्तास उपलब्ध नाही. सीटी स्कॅन, एमआरआय आदी सुविधांही नाहीत. रुग्णालयाची जुनी इमारत पाडून उभारलेल्या नवीन इमारतीत सध्या हे रुग्णालय सुरू आहे. रुग्णालयामध्ये विविध वैद्यकीय सुविधा महापालिका प्रशासनाने दिल्या आहेत. मात्र, या सुविधा देताना काही बाबींची पुर्तता अद्याप होऊ शकलेली नाही. बाह्यरुग्ण विभागात दररोज 400 ते 500 रुग्णांवर उपचार केले जातात. रुग्णालयात 120 खाटांची सुविधा आहे. त्यापैकी सरासरी 70 ते 80 खाटांवर रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत.
हव्या असलेल्या सुविधा
हाडांच्या शस्त्रक्रियांसाठी (अस्थिरोग शस्त्रक्रिया) ऑपरेशन थिएटर
दंतरोग विभाग आणि सोनोग्राफीची सुविधा
सीटी स्कॅन, एमआरआय, एन्जिओग्राफी
अपघातानंतर उपचारासाठी येणार्या रुग्णांवर आंतररुग्ण विभागात उपचार
शस्त्रक्रिया विभागासाठी शल्यविशारदांची गरज
सध्या उपलब्ध असलेल्या सुविधा
स्त्री रोग, मेडिसीन विभाग, लहान मुलांचा वॉर्ड
महिलांची प्रसूती व कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया, पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया
बाह्यरुग्ण विभाग, जन्म-मृत्यू विभाग, अपघातासंदर्भात प्राथमिक उपचार
कोविड आणि लहान मुलांच्या लसीकरणाची सोय
नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग
जिजामाता रुग्णालयात शस्त्रक्रिया विभाग 24 तास सुरू करण्यात येणार आहे. सोनोग्राफी विभाग पुढील 15 दिवसांत सुरू करण्याचे नियोजन आहे. तसेच, दंतरोग विभाग आणि सोनोग्राफीची सुविधा लवकरात लवकर देण्याचे नियोजन आहे. हाडांच्या शस्त्रक्रियांसाठी 3 ऑपरेशन थिएटर प्रस्तावित आहे.
-डॉ. अल्वी नासेर, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, जिजामाता रुग्णालय
अपघात झाल्यानंतर उपचारासाठी येणार्या रुग्णांवर जिजामाता रुग्णालयात केवळ प्राथमिक उपचाराची सुविधा आहे. अपघातग्रस्त रुग्णांवर आंतररुग्ण विभागात आवश्यक उपचाराची सुविधा उपलब्ध करुन द्यावी. तसेच, दंतोपचाराची सोय झाल्यास नागरिकांना वायसीएमला जाण्याची गरज उरणार नाही.
– विवेक मुलाणी, नागरिक