पुणे

पिंपरी : ‘छत्रपती शाहू महाराज लोककल्याणकारी राजे’ : अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शाहू महराज हे समाजातील सर्व घटकांना समानतेचा दर्जा मिळवून देण्यासाठी व स्त्री शिक्षणाचा प्रसार करण्याकरिता कृतीशील प्रयत्न करणारे आरक्षणाचे जनक होते. ते खर्‍या अर्थाने रयतेचे लोक कल्याणकारी राजे होते, असे प्रतिपादन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.

पालिकेच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त केएसबी चौक येथील पूर्णाकृती पुतळ्यास आणि पालिका भवनातील प्रतिमेस जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला, या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमात माजी महापौर मंगला कदम, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, कोल्हापूर जिल्हा मित्र मंडळाचे पांडुरंग पाटील, मिलिंद वेल्हाळ आदी उपस्थित होते.

भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल यांसह विविध संघटना, पक्ष यांच्यावतीने राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले. दरम्यान, पालिकेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज विचार प्रबोधन पर्वामध्ये दोन दिवस कार्यक्रम संभाजीनगर येथील साई उद्यान येथे झाले. एस. के. प्रॉडक्शनच्या वतीने जागर लोकपरंपरेचाया कार्यक्रमातून लोककला, शेतकरी गीते सादर करण्यात आली. सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन
पिंपरी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती विविध संस्था, संघटनांच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. के. एस. बी. चौक येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष अ‍ॅड. लक्ष्मण रानवडे यांनी अभिवादन केले. जिजाऊ संघटनेच्या उपाध्यक्षा माणिक शिंदे, शालन घाटुळ यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. मराठा सेवा संघाच्या उद्योग कक्षाचे अध्यक्ष प्रकाश जाधव, मराठा सेवा संघाचे महासचिव सचिन दाभाडे, संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे, अ‍ॅड. सुनील रानवडे, सुरेश इंगळे तसेच मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते. आदिवासी पारधी समाज सुरक्षा दलाच्यावतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास संघटनेचे अध्यक्ष किसन भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक शैलेंद्र मोरे, संघटनेचे सुनील पवार, तिफन्ना काळे, नरेश शिंदे, समीर पवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

समाजात समता स्थापन करण्याचे कार्य महाराजांनी केले
भोसरी : छत्रपती शाहू महाराजांनी सर्व जाती-धर्मातील लोकांसाठी योग्य अशा राज्याची निर्मिती केली. सगळ्या जाती-धर्मातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण केले. आपल्या राज्यात खर्‍या अर्थाने समता स्थापन करण्याचे काम शाहू महाराजांनी केले, असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी केले.
केएसबी चौक चिंचवड येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. संभाजी ब्रिगेडचे शहर कार्याध्यक्ष संजय जाधव यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी संभाजी ब्रिगेडचे सचिव मंगेश चव्हाण, उपाध्यक्ष नितीन जाधव, संघटक विनोद घोडके, महेश कांबळे, बाळासाहेब वाघमारे, योगेश पाटील, संतोष सुर्यवंशी, विजय शेलार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

दापोडीत पुष्पहार अर्पण
दापोडी ः राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दापोडीमध्ये त्यांच्या प्रतिमेस संजय काटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या वेळी विनायक काटे, लक्ष्मीकांत बाराथे, विजय शिंदे, जयसिंग काटे, निखिल मते आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रवींद्र बाईत यांनी केले तर कालीचरण पाटोळे यांनी आभार मानले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT