पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : निगडी-यमुनानगर येथील पिंपरी-चिंचवड आयटीआयच्या इलेक्ट्रिशन ट्रेडला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. आतापर्यंत या ट्रेडच्या 40 पैकी 34 जागा भरल्या गेल्या आहेत. म्हणजे जवळपास 85 टक्के जागा भरल्या आहेत. त्या खालोखाल ड्रॉफ्ट्समन मेकॅनिकल या ट्रेडच्या 40 पैकी 24 म्हणजे जवळपास 60 टक्के जागा भरल्या गेल्या आहेत.
राज्यातील विविध आयटीआयची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सध्या सुरू आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या hrrqt://admirrion.dvet.gov.in संकेतस्थळावर ही सुविधा देण्यात आलेली आहे. मंगळवारी (दि. 16) प्रवेशाच्या दुसर्या फेरीची मुदत संपली. आजपासून तिसरी फेरी सुरू झाली. पिंपरी-चिंचवड आयटीआयमध्ये एकूण 15 प्रकारच्या औद्योगिक व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 572 जागा आहेत. त्यापैकी आजअखेर एकूण 188 जागा भरल्या गेल्या आहेत. तर, 384 जागा अद्याप रिक्त आहेत. म्हणजे सद्यःस्थितीत 32.86 टक्के इतक्याच जागा भरल्या गेल्या आहेत. प्रवेशाच्या एकूण पाच फेर्या होणार आहेत. तिसरी फेरी पुढील तीन दिवस चालणार आहे.
कार्पेंटर, फाउंड्रीमॅन आदींना थंड प्रतिसाद
कार्पेंटर, फाउंड्रीमॅन, ऑपरेशन अॅडव्हान्स मशीन टूल आदी ट्रेडना थंड प्रतिसाद मिळाला आहे. कार्पेंटर ट्रेडच्या 48, ऑपरेशन अॅडव्हान्स मशीन टूलच्या 16 तर, फाउंड्रीमॅन ट्रेडच्या 48 जागा असून, त्या सर्व जागा अद्याप रिक्त आहेत. आतापर्यंत प्रवेशाच्या दोन फेर्या झाल्या असल्या तरी या जागा भरल्या गेलेल्या नाही. आता पुढील फेर्यांमध्ये या जागा भरल्या जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पिंपरी-चिंचवड आयटीआयमधील ड्रॉफ्टस्मन सिव्हिल या ट्रेडच्या 24 पैकी 14 जागा भरल्या गेल्या आहेत. म्हणजे जवळपास 58.33 टक्के इतक्या जागा भरल्या आहेत. त्या खालोखाल 50 टक्के जागा टर्नर ट्रेडच्या भरण्यात यश आले आहे. येथील 20 पैकी 10 जागांवर विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. तर, वेल्डर ट्रेडच्या आतापर्यंत 60 पैकी 28 जागा भरल्या गेल्या आहेत.
आयटीआय प्रवेशाची दुसरी फेरी पूर्ण झाली आहे. तिसरी ऑनलाइन फेरी आजपासून सुरू झाली. पिंपरी-चिंचवड आयटीआयमध्ये आतापर्यंत 188 जागा भरल्या गेल्या आहेत. प्रवेशाच्या आणखी तीन फेर्या होणार आहे. 384 रिक्त जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल.
– शशिकांत साबळे, प्राचार्य, पिंपरी-चिंचवड आयटीआय, निगडी-यमुनानगर.