पुणे

पिंपरी : गौरींसाठी मुखवटे, फेटे, दागिने, नऊवारी साड्या

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : गणपतींच्या पाठोपाठच गौरींचे आगमन होते. गणपतीच्या सजावटीसोबतच गौरींच्या खरेदीसाठी महिलावर्गाची खास तयारी सुरू आहे. यंदा गौरींसाठी रेडिमेड नऊवारी साडी आणि दागिन्यांची रेलचेल आहे. गौरींचे आगमन झाल्यानंतर तीन दिवस येऊन राहून जातात. त्याच्या तयारीत आता सगळा महिलावर्ग दंग आहे. अगदी मूर्तींच्या खरेदीपासून सुरुवात होते. सध्या बाजारात गौरींच्या कापडी, शाडूच्या, 'पीओपी'च्या अशा तीन प्रकारच्या मूर्ती उपलब्ध आहेत. अनेक सुबक, विविध आकाराच्या, आखीव रेखीव मुखवटे आणि सजलेल्या गौरी बाजारात उपलब्ध आहेत.

खळी असलेले आकर्षक मुखवटे
यंदा गौरी मुखवट्यांमध्ये गालावर खळी असलेले मुखवटे आकर्षणाचा भाग ठरत आहेत. मुखवट्यांची किंमत 500 ते 1000 रुपयांपर्यंत आहे. मूर्तीच्या बॉडीची किंमतही 500 रुपयांपासून सुरू होते. स्टँडही आकारानुसार उपलब्ध आहे. त्यांचीही किंमत 500 ते 800 रुपये अशी आहे. अखंड मूर्ती स्टँडसह 4000 ते 8000 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. यंदा गौरीच्या सजावटींच्या वस्तूंचे दरही 15 ते 20 टक्क्यांनी वाढले आहेत. तसेच यंदा फायबर बॉडीच्या गौरीही उपलब्ध झाल्या आहेत. त्या 10 ते 12 हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.

फेटे घातलेल्या गौरींचा रूबाब न्यारा
सध्या गौरींना नऊवार पैठणी आणि त्यांना फेटे घालण्याचा ट्रेंड दिसत आहे. दरवर्षीपेक्षा काहीतरी वेगळे असावे, असा महिलांचा प्रयत्न असतो. बाजारात नऊवार घातलेल्या आणि डोक्यावर फेटा असलेल्या गौरी उपलब्ध आहेत. या फेट्यांना मागे लेस असल्याने मुखवट्याप्रमाणे फेटा अ‍ॅडजस्ट करता येतो. नऊवार साडी आणि फेटा घातल्यामुळे गौरींचे रुबाबदार रुप पाहायला मिळत आहे.

पारंपरिक दागिने
दागिने खरेदी हा तर गौरीच्या खरेदीचा महत्त्वाचा भाग आहे. दागिन्यांमध्ये लक्ष्मीहार,चपलाहार, मोहनमाळ, ठुशी, बोरमाळ, राणीहार, मंगळसूत्र, मोत्यांचे दागिने, नथ, कंबरपट्टा,बांगड्या या दागिन्यांनी गौरींना सजवले जाते. पारंपारिक म्हणून मोत्यांचे दागिने देखील आवर्जुन वापरतात. तसेच मोहनमाळ, पुतळ्या, बोरमाळ, कोल्हापुरी साज या दागिन्यांनी बाजारपेठ सजली आहे. माळा आणि दागिने 150 रुपये ते 3000 रुपये अशा किमंतींत बाजारात उपलब्ध आहे. दागिन्यांमध्ये मोत्यांचे आणि खड्यांचे दागिने, पाहायला मिळत आहे. मुकुटांमध्ये अधिक सुबक आणि नाजूक डिझाईनच्या मुकुटांना अधिक मागणी पाहायला मिळतेय. मोत्याच्या दागिन्यांच्या किंमतींमध्येही विविधता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT