पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : आईस्क्रीम विक्रेत्याकडे चौघांनी मिळून खंडणी मागितली. विक्रेत्याने खंडणी देण्यास नकार दिल्याने आरोपींनी दुकानातील कामगारांना मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 27) रात्री शिवाजी चौक, तळेगाव दाभाडे येथे घडली. हरीश पप्पू शर्मा (24, रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, हर्ष प्रमोद साठे (19, रा. वराळे, ता. मावळ), कुमार सुरेश मोहिते (19, रा. तळेगाव दाभाडे), अनिल सुरेश मोहिते (21, रा. तळेगाव दाभाडे), जय प्रवीण भालेराव (18, रा. तळेगाव दाभाडे) यांना अटक करण्यात आली आहे.
फिर्यादी यांचे तळेगाव दाभाडे येथील शिवाजी चौकात आईस्क्रीमचे दुकान आहे. दरम्यान, बुधवारी रात्री अकराच्या सुमारास आरोपी फिर्यादी यांच्या दुकानात घुसले. त्यांनी फिर्यादी यांच्याकडे हप्त्याची मागणी केली. त्यावेळी फिर्यादी यांनी हप्ता देण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपींनी दुकानातील वस्तूंची तोडफोड करून कामगारांना मारहाण केली. त्यांनतर आरोपींनी फिर्यादी यांच्या खिशातील पाच हजार रुपये बळजबरीने काढून घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तळेगाव दाभाडे पोलिस तपास करीत आहेत.