नंदकुमार सातुर्डेकर :
पिंपरी : कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तीला पूर्ण बरे झाल्यानंतर वर्षभरानंतरही एल.आय.सी. पॉलिसीसाठी नकारघंटा ऐकण्याची वेळ येत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विमाधारक संताप व्यक्त करीत आहेत. पिंपरीतील एका 56 वर्षीय व्यक्तीला दिनांक 31 मार्च 2021 रोजी कोरोनाची लागण झाली, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर सदर रुग्ण पूर्णत: बरा झाला.
यानंतर एलआयसी एजंटच्या आग्रहाखातर सदर व्यक्तीने जीवन लाभ पॉलिसीसाठी दि 22 मार्च 2022 रोजी अर्ज दिला या योजनेअंतर्गत सोळा वर्षाची टर्म मात्र दहा वर्षे हप्ते भरायचे ,सोळा वर्षापर्यंत रिस्क कव्हर राहील त्यानंतर भरलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम परत असा लाभ मिळणार होता. त्यासाठी सदर व्यक्तीने दरमहा प्रत्येकी अडीच हजार याप्रमाणे चार महिन्याचे एकूण दहा हजार रुपये भरले.
वैद्यकीय पॉलिसीसाठी सदर व्यक्तीच्या वैद्यकीय तपासणीही करण्यात आल्या. चेस्ट, ईसीजी, शुगर, लघवी आदी तपासण्यांचा त्यात समावेश होता. सर्व तपासण्या पूर्ण होऊन पैसे भरल्यानंतर या व्यक्तीने जूनपर्यंत पॉलिसी घरी येण्यासाठी वाट पाहिली त्यानंतर या व्यक्तीने विमा एजंट कडे चौकशी केली असता आपली पॉलिसी सहा महिने पोस्टपोन केली आहे सहा महिन्यानंतर पॉलिसी काढता येईल आत्ता नाही असे सांगण्यात आले.
त्यामुळे संतप्त झालेल्या या इच्छुक विमाधारकाने आपल्याला आता सहा महिन्यानंतरचा (पोस्ट पोन )विमा नको माझे भरलेले पैसे परत द्या असे खडे बोल सुनावले. त्यानंतर विमा एजंटने पैसे परत मिळण्यासाठी सदर इच्छुक विमाधारकाकडून फॉर्म भरून घेतला .पॅन कार्ड ,आधार कार्ड,, बँकेचा कॅन्सल चेक हा प्रपंच त्या व्यक्तीला भरलेली विमा रक्कम परत मिळण्यासाठी करावा लागला.विमा मंजूर होण्याआधी रक्कम भरायला लावलीच कशाला? असा प्रश्न सदर विमा धारकाने केला आहे.
एलआयसी पॉलिसीसाठी अर्ज केल्यानंतर त्या व्यक्तीची वैद्यकीय तपासणी केली जाते. एमडी झालेले डॉक्टर तपासणी करतात. हे रिपोर्ट गेल्यानंतर विम्याबाबत निर्णय घेतला जातो. विमा नाकारला गेल्यास ही रक्कम परत दिली जाते; मात्र खासगी विमा कंपन्यांपेक्षा आमची सेवा अतिशय चांगली आहे.
– मनीषा कुरळे
एलआयसी अधिकारी